मास्टरब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ‘हरित सेना प्रमुख’ पद देण्याचा सरकारचा प्रस्ताव असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे यासंदर्भात बुधवारी दुपारी त्यांची भेट घेणार आहेत. व्याघ्रसंवर्धन उपक्रमाचे प्रचारदूत (ब्रँड अँबेसिडर) म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची घोषणा झाल्याने तेंडुलकर यांना हरित सेना व वनसंवर्धनाच्या उपक्रमासाठी नियुक्त करण्याचा सरकारचा विचार आहे. याव्यतिरिक्तही त्यांना अन्य कोणत्याही बाबीसाठी मदत करण्याची इच्छा असल्यास सरकारची तयारी असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
व्याघ्रसंवर्धनासाठी प्रचारदूत म्हणून काम पाहण्यासाठी तेंडुलकर यांना पत्र पाठविण्यात आले होते. पण त्यांचे उत्तर येण्याआधी अमिताभ बच्चन यांनी सरकारला मदतीची तयारी दाखविल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आली. बच्चन आणि तेंडुलकर यांच्यासारख्या सुप्रसिध्द व्यक्तींनी कोणताही मोबदला न घेता सरकारला मदतीची तयारी दाखविल्याचे मुनगंटीवर यांनी सांगितले.

वनसंवर्धन व अन्य बाबींसाठी हरित सेना उपक्रम असून सुमारे दहा लाख विद्यार्थी व एक लाख शिक्षक यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जातील. त्यासह वन विभागातील कोणत्याही बाबींसाठी काम करण्याची तेंडुलकर यांची तयारी असल्यास त्यांची नियुक्ती केली जाईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.