लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन
लोकलमधील प्रचंड गर्दीवर तोडगा म्हणून कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांच्या वेळा अध्र्या तासांच्या अंतराने बदलणे शक्य आहे आणि प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दिली.
लोकलच्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी कार्यालये व शाळा-महाविद्यालयांच्या वेळा बदला, तसेच साप्ताहिक सुट्टीचे दिवसही बदला, अशी सूचना न्यायालयाने मागच्या सुनावणीवेळी सरकारला केली होती. हे बदल करणे शक्य आहे का, याबाबत उत्तर देण्यास न्यायालयाने सांगितले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा आरक्षित ठेवण्यासह रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी गर्दीवर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने केलेली सूचना अमलात आणणे शक्य असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील पद्मभूषण काकडे यांनी न्यायालयात दिली. त्यावर दिल्लीत ज्याप्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी सम-विषमचा तोडगा प्रायोगिक तत्त्वावर अमलात आणला गेला असताना तसाच प्रयोग येथे का केला जात नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली.
कार्यालयांच्या वेळा बदलण्याच्या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. तसेच प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी त्यादृष्टीने अन्य विभागांकडून त्याबाबत मते मागवली आहेत, अशी माहिती काकडे यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने सरकारच्या या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले, मात्र त्याच वेळी राज्य सरकारने रेल्वे चालवण्याबाबतच्या सूचनेचाही विचार करण्याचे न्यायालयाने पुन्हा एकदा सुचवले.
राज्य सरकार खासगी कंपनीच्या साहाय्याने ‘मेट्रो’ चालवत असेल, तर लोकल सेवा चालविण्यास काय हरकत आहे, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.

लोकलच्या स्वरूपाचा आराखडा सादर करण्याचे आदेश
हार्बर मार्गावर गेल्या २५ ते ३० वर्षांपासून एकही नवी लोकल चालविण्यात आलेली नाही. या लोकलची अवस्था वाईट आहे, अशी माहिती हस्तक्षेप याचिकेद्वारे न्यायालयाला निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची दखल घेत अशा किती लोकल चालवत आहे, अशी विचारणा करताना जुन्या व नव्या लोकलच्या स्वरूपाचा आराखडा सादर करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले.