|| संतोष प्रधान

महसूल सचिवपदी अजयभूषण पांडे; केंद्रात राज्याचे आता दोन सचिव 

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या सेवेतील अधिकारी अजयभूषण पांडे यांची महसूल या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केल्याने दिल्लीत महाराष्ट्राचा एका अर्थी सन्मान झाला आहे. पांडे यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या सेवेतील दोन अधिकाऱ्यांकडे सचिवपदाची जबाबदारी आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवेत गुजरातच्या अधिकाऱ्यांचा दबदबा निर्माण झाला. सनदी अधिकाऱ्यांची महाराष्ट्राची थोर परंपरा असली तरी सध्या केंद्रात राज्याच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्याकडे महत्त्वाची जबाबदारी नव्हती. अजयभूषण पांडे सध्या आधार म्हणजेच ‘यूनिक अ‍ॅडिटिंफिकेशन अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असून, त्यांच्याकडे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाचे अध्यक्षपदही आहे. या दोन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत राहणार आहे. वित्त विभागात महसूल सचिवपद तसेच आधार व वस्तू आणि सेवा कर अशी तिहेरी महत्त्वाची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांनी पांडे यांच्यावर सोपविली आहे. गृह, परराष्ट्र, संरक्षणसह महसूल सचिव हे केंद्रात महत्त्वाचे पद मानले जाते. महाराष्ट्र कॅडरमधील संजीवनी कुट्टी या केंद्रात संरक्षण विभागात माजी सैनिक कल्याण विभागाच्या सचिव आहेत. यापुढे पांडे आणि कुट्टी हे दोन सनदी अधिकारी सचिव पदावर असतील.

केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू या राज्यातील नेत्यांकडे महत्त्वाच्या खात्यांचा पदभार आहे. याशिवाय दोन सनदी अधिकारी सचिवपदी असतील. अजयभूषण पांडे यांनी राज्याच्या सेवेत असताना चांगली कामगिरी केली होती. विशेषत: महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असताना शिस्त आणण्याचा प्रयत्न केला होता.

आतापर्यंत चार कॅबिनेट सचिव

राज्याच्या सेवेतील सनदी अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. यशवंत सुखथनकर (१९५३ ते १९५७), दत्तात्रय जोशी (१९६६ ते १९६८), भालचंद्र देशमुख (१९८६ ते १९८९), एस. राजगोपाळ (१९९२ ते १९९३) या राज्यातील चार अधिकाऱ्यांनी देशातील सर्वोच्च असे कॅबिनेट सचिवपद भूषविले आहे. याशिवाय राम प्रधान व डॉ. माधव गोडबोले यांनी केंद्रात गृह सचिवपद भूषविले होते.