राज्यात दिवसेंदिवस करोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवार अर्थात आजपासून मध्य रेल्वेच्या सहा महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटची विक्री होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, दादर, पनवेल, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं. “सध्याच्या उन्हाळ्यात अनावश्यक गर्दी होऊ नये आणि रेल्वे स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी पीटीआयला दिली.

दरम्यान, रेल्वे स्थानकांवरील जास्त गर्दी टाळण्यासाठी यापूर्वी रेल्वे प्रशासनाने  मुंबई, नागपूर आणि भुसावळ विभागांतर्गत काही महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत वाढ केली होती. तर, करोनाचा वेगाने होणार संसर्ग लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने 30 एप्रिलपर्यंत शहरातील सर्व बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवली आहेत.