महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपाची राज्यसभेची ऑफर स्विकारली आहे. त्यामुळे ते आता अधिकृतरित्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामिल होणार आहेत. सोमवारी, १२ मार्च रोजी ते राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सुरुवातीला भाजपाच्या या प्रस्तावावर नारायण राणे यांनी विचार करुन निर्णय घेण्याची भुमिका घेतली. एकूणच ते राज्यसभेसाठी उत्सुक नव्हते. त्यांना केंद्रात नव्हे तर राज्याच्या राजकारणातच रस असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अखेर त्यांनी ही ऑफर मान्य केली. दरम्यान, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेसमध्ये असताना अनेक मतभेद असल्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडले होते. यावेळी विधानपरिषदेतील आमदारकीचाही त्यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते भाजपासोबत जातील अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला ही बाब मान्य नव्हती. त्यामुळे राणेंना भाजपात प्रवेश देण्यात आला नाही. मात्र, त्यानंतर राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना एनडीएत सामावून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. मात्र, तरीही त्यांना राज्यात मंत्रीपद देण्यात अडचणी येत असल्याने भाजपाने त्यांना राज्यसभेची ऑफर दिली.

एप्रिलमध्ये राज्यसभेच्या ५८ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, रिक्त होणाऱ्या या राज्यसभेच्या जागांसाठी २३ आणि २६ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत.