25 January 2020

News Flash

‘लोकांकिके’तील कलाकारांच्या पाठीवर महेश एलकुंचवार यांची कौतुकाची थाप

 ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम फेरीसाठी खास अतिथी म्हणून उपस्थिती महाविद्यालयीन स्तरावर एकांकिका लिहिताना, धडपड करून त्या बसवताना आणि शेवटी ‘लोकसत्ता लोकांकिके’सारख्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्या सादर करताना

 ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम फेरीसाठी खास अतिथी म्हणून उपस्थिती
महाविद्यालयीन स्तरावर एकांकिका लिहिताना, धडपड करून त्या बसवताना आणि शेवटी ‘लोकसत्ता लोकांकिके’सारख्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्या सादर करताना आपल्या पाठीवर कोणाची तरी कौतुकाची थाप पडावी, असे सतत वाटत असते. जाणत्या नजरेने आपल्या नाटकातल्या चुका दाखवून द्याव्यात, त्या सुधारण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशीही इच्छा असते. राज्यभरातील महाविद्यालयांमधील नाटय़वेडय़ा तरुणांसाठी ही संधी सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत रंगणाऱ्या महाअंतिम फेरीत महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठीच नाही, तर महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ ठरलेल्या एकांकिकेला चषक देऊन गौरवण्यासाठी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार उपस्थित राहणार आहेत.
मराठी रंगभूमीला जागतिक स्तरावर घेऊन जाणाऱ्या नाटककारांमध्ये विजय तेंडुलकर यांच्याबरोबरच महेश एलकुंचवार यांचाही मोलाचा वाटा आहे. ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘पार्टी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘युगान्त’, ‘वासांसि जिर्णानि’ अशा एकापेक्षा एक वेगळ्या पठडीतील नाटकांमधून त्यांनी मराठी रंगभूमीच्या कक्षा रुंदावल्या. इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असलेले एलकुंचवार नाटकांच्या स्पर्धाना क्वचितच उपस्थित असतात. मात्र, राज्यभरातील तरुणाईच्या नाटय़वेडाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या गेल्या वर्षीच्या महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ नाटय़दिग्दर्शिका विजया मेहता उपस्थित होत्या. आपल्या मनोगतातून त्यांनी कलाकारांना उत्तम मार्गदर्शनही केले होते. यंदा महेश एलकुंचवारांसारखे अभ्यासू आणि मनस्वी व्यक्तिमत्त्व मार्गदर्शनासाठी लाभणार आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी टॅलेण्ट पार्टनर म्हणून आयरिस प्रॉडक्शन ही संस्था काम करणार असून अस्तित्व या संस्थेच्या मदतीने ही स्पर्धा राज्यभरातील आठ केंद्रांवर होणार आहे. यंदा प्राथमिक फेरीसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम या स्पर्धेसह आहेत. तसेच झी मराठी नक्षत्र हे टेलिव्हिजन पार्टनर असून नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल काम पाहणार आहेत.

अर्ज स्वीकृतीची अंतिम  तारीख २५ सप्टेंबर
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी राज्यभरातील आठही केंद्रांवर भरभरून अर्ज येत आहेत. मात्र ज्या महाविद्यालयांनी काही कारणास्तव अद्यापही अर्ज भरलेले नाहीत, त्यांच्यासाठी २५ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. २९ सप्टेंबरपासून राज्यभरात ‘लोकांकिके’ची धुमाळी सुरू होईल. अर्ज व नियम आणि अटी यांसाठी www.loksatta.com/lokankika2015 या संकेतस्थळाला भेट द्यावी.

First Published on September 23, 2015 1:35 am

Web Title: mahesh elkunchwar presence as a guest in loksatta lokankika final round
Next Stories
1 आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन ४ ऑक्टोबरला
2 लाच प्रकरणातील ‘संभाषणा’ची तपासणी आता राज्यभरातील न्यायवैद्यक शाळेत!
3 सोनसाखळी चोरांना दहा वर्षे शिक्षा?
Just Now!
X