डागडुजीच्या कामांसाठी मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी १ नोव्हेंबर २०१९ ते २८ मार्च २०२० पर्यंत रोज आठ तास बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या विमानांना विलंब होण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी सोमवार ते शनिवापर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० अशी आठ तास बंद ठेवण्यात येईल. त्याऐवजी पर्यायी धावपट्टीचा वापर केला जाणार आहे. पर्यायी धावपट्टी आकाराने लहान असल्याने त्याचा वापर फार कमी होतो. त्यामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या विमानांना उशीर होईल. डागडुजीचे काम दर रविवारी तसेच २५ डिसेंबर, १ जानेवारी, १५ जानेवारी, १९ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी, १० मार्च व २५ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही होणार नसल्याचे मुंबई विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले.