येत्या रविवारी नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत.  चार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी संभाळणारे सुनील तटकरे यांच्या जागी नवीन नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी नेत्यांची नावे चर्चेत आहेत. येत्या रविवारी २९ एप्रिलला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सर्वसंमतीने नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्षपदाची चार वर्षे आपण जबाबदारी संभाळली, आता ही जबाबदारी अन्य सक्षम नेत्याकडे द्यावी अशी आपण पक्ष नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी रविवारी २९ एप्रिलला बैठक होणार आहे. त्यात सर्वाच्या सहमतीने प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाईल, असे तटकरे यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसशी आघाडीचा प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणुका लढविण्याचा प्रयत्न आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.

राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. गेली चार वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी पक्षवाढीसाठी केलेले काम आणि पक्षाची एक चांगली ओळख निर्माण केल्याबद्दल शरद पवार यांनी त्याची दखल घेऊन त्यांच्यावर आता राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी टाकली आहे. पवार यांनी तटकरे यांच्या नव्या नियुक्तीचे पत्र पक्षाचे सरचिटणीस तारिक अन्वर यांना दिले आहे. नव्या जबाबदारीबद्दल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.