स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याऐवजी परदेशातील उद्योजकांना इथे बोलवायची  गरज काय? उद्योग वाढवायचेच असतील तर मग इव्हेंट्सचा दिखाऊपणा कशाला? असे प्रश्न उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमावर सडकून टीका केली. मुंबईत बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इव्हेंटबाजीकरून कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याचा गवगवा करून काहीच उपयोग नाही. सामंजस्य करार होणे म्हणजे राज्यात उद्योगांची भरभराट होणे असे नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी ‘मेक इन इंडिया’वरून नरेंद्र मोदी यांच्यावरही शरसंधान साधले. ‘मेक इन इंडिया’च्या बोधचिन्हासाठी सिंहच का?  नरेंद्र मोदींच्या डोक्यातून गुजरात अजूनही गेलेला नाही हे यामधून सिद्ध होते.
गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही ‘व्हायब्रंट गुजरात’सारख्या कल्पना राबवल्या गेल्या. हजारो कोटींची गुंतवणूक झाल्याच्या बातम्याही त्यावेळी आल्या पण प्रत्यक्षात गुजरातमध्ये उद्योगांची भरभराट झाल्याचे काही दिसून आले नाही. ‘मेक इन इंडिया’चीही तीच गत आहे. उद्योग आणायचेच असतील तर थेट उद्योगपतींना गाठून करार करा, त्यासाठी इव्हेंटबाजी कशाला हवी? असा सवालही राज यांनी यावेळी उपस्थित केला.