सावकाराच्या जाचाला कंटाळून एका सावकारानेच मुलुंड येथे आत्महत्या केली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
उमेश बोंबले (३७) असे मृताचे नाव आहे. रविवारी त्याने घरात कुणी नसताना पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. उमेशचा कटलरीच्या व्यवसायाबरोबर पैसे व्याजाने देण्याचा सावकारी व्यवसाय होता. तो भिशीसुद्धा चालवत होता. परंतु काही महिन्यापूंर्वी तो चालवत असलेली ९० लाखांची एक भिशी घेऊन एक व्यापारी फरारी झाला होता. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता. अधिक व्याज मिळेल यासाठी काही सावकारांनी उमेशकडेच मोठी रक्कम गुंतवली होती. परंतु स्वत: उमेश आर्थिक अडचणीत आल्याने हे पैसे त्यांना परत करू शकत नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे पैसे गुंतवणारे गुरूनाथ गवळी, सचिन गवळी, संगीता गवळी, रोहन गवळी, वैभव गवळी यांनी त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. त्यांनी उमेशला त्याच्या दुकानावर जाऊन मारहाणही केली होती. त्याबद्दल त्याने पोलिसांत तक्रारही केली होती. या त्रासाला कंटाळून शेवटी रविवारी संध्याकाळी उमेशने आत्महत्या केली. त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून संगिता गवळीसह चौघांना अटक केली आहे. सचिन गवळी फरारी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2014 12:03 pm