मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कुर्ला सिग्नलजवळच्या उघड्या गटारात पडून एका माणसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या माणसाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र रात्री उशिरा ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ला सिग्नलजवळ अनेक मॅनहोल्सना झाकणे नाहीत अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षापासून आम्ही याबाबत तक्रार करतो आहोत, मात्र आमच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते आहे असेही स्थानिकांनी म्हटले आहे.

याच महिन्यात ८ जूनला मुंबईतील चेंबूर या ठिकाणी उघड्या गटारात पडून तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. चिता कँप परिसरात ही घटना घडली होती. अधिन तांबोळी असे या मुलाचे नाव होते तो खेळता खेळता उघड्या गटारात पडला, त्याला रहिवाशांनी तातडीने बाहेर काढले पण रूग्णालयात घेऊन जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच हा महिना संपण्याच्या आत उघड्या गटारात पडून आणखी एका माणसाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.