उनो कार्ड खेळताना झालेल्या वादातून २४ वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. अबूझर अन्सारी असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी नूर मोहम्मद मन्सूरी (२२) याला अटक केली आहे.

मुंबईतील आग्रीपाडा येथे अबूझर अन्सारी आणि त्याची आई राहते. अबूझर हा दररोज कामावरुन परतल्यावर काही वेळ आईसोबत गप्पा मारायचा. यानंतर तो शेजारच्या मुलांसोबत उनो कार्ड्स खेळायचा. शनिवारी संध्याकाळी अन्सारी उनो कार्ड खेळण्यासाठी घराबाहेर आला. याच दरम्यान तिथून मन्सूरी जात होता. अबूझर अन्सारीने मन्सूरीलाही खेळायला बोलावले. सुमारे एक तास त्यांचा खेळ शांतपणे सुरु होता. पण प्रत्येक डावात पराभव झाल्याने मन्सूरी चिडला. अबूझर फसवून प्रत्येक डाव जिंकत असल्याचा मन्सूरीचा आरोप होता. तर मन्सूरीचे म्हणणे ऐकून अन्सारी हसत होता. यामुळे संतापलेल्या मन्सूरीने स्वत:कडील चाकू काढला आणि अबूझरवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या अबूझरला स्थानिकांनी रुग्णालयात भरती केले. मात्र, तोपर्यंत अबूझरचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर मन्सूरी पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला काही तासांमध्येच अटक केली. मन्सूरीने अबूझरच्या पाठीवर, छातीवर, खांद्यावर वार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.