पनवेल-शीव महामार्गावर कामोठे टोलनाका परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठय़ा प्रमाणात कांदळवनांची कत्तल करण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. खाडीवर अतिक्रमण करणाऱ्यांनी येथील कांदळवने उखडून टाकण्यासाठी क्रेन व डम्परची रांगच लावली आहे.
पनवेल-शीव महामार्गावरील रुंदीकरण व पदपथ उभारणीच्या नावाखाली कांदळवनांची सर्रास कत्तल सुरू आहे. रात्रीच्या अंधारातच ही कामे चालतात. विशेषत: शनिवार आणि रविवारच्या सरकारी सुट्टीची संधी साधून ही कामे उरकण्यात येतात. शनिवारी सायंकाळीही कामोठे टोलनाक्यानजीक कांदळवनाच्या कत्तलीसाठी मोठमोठे डम्पर, क्रेन, जेसीबी आदी साहित्य या ठिकाणी आणून ठेवण्यात आले होते. ‘लोकसत्ता’च्या छायाचित्रकाराने याची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करताच तेथील मजूर पळून गेले.

कोपरा ते कामोठे या दरम्यान असणाऱ्या कांदळवनांच्या कत्तलीबाबत याआधीही पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला आहे. मात्र, तरीही हे प्रकार सर्रास सुरूच असल्याचे निदर्शनास येते. दरम्यान, यासंदर्भात  पनवेलचेतहसीलदार पवन चांडक व प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कांदळवने नष्ट केली जाणे ही गंभीरच बाब आहे. संबंधित घटनेची चौकशी करून पर्यावरण रक्षण कायद्याअंतर्गत  कारवाई केली जाईल.  
– श्रीराम मुल्लेवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कामोठे)

आमच्या कंपनीने कधीच कांदळवने तोडून काम केलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर महिन्यातच आमचे काम पूर्ण झाले. त्यानंतर कोणतेही काम हाती घेतलेले नाही.
-उमेश सोनावणे (प्रवक्ते, सायन पनवेल टोलवेज प्रा. लि.)