भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाइस अ‍ॅडमिरल मनोहर प्रल्हाद (एम. पी.) आवटी यांचे रविवारी सातारा जिल्ह्य़ातील फलटणजवळील विंचुर्णी या मूळ गावी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

मनोहर आवटी यांचा जन्म ७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबई आणि पुणे येथे झाले. १९४५ साली त्यांची रॉयल इंडियन नेव्हीत (ब्रिटिशकालीन भारतीय नौदल) निवड झाली. तेव्हापासून १९८३ साली भारतीय नौदलातून निवृत्त होईपर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. आवटी हे सिग्नल आणि दळणवळण क्षेत्रातील तज्ज्ञ होते.

त्यांनी नौदलाच्या रणजित, वेंदुर्थी, दिल्ली आदी नौकांवर सेवा बजावली. तसेच बेतवा, तीर आणि म्हैसूर या युद्धनौकांचे नेतृत्व केले. बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात आयएनएस कामोर्ताचे कमांडिंग ऑफिसर म्हणून अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना वीरचक्र प्रदान करून गौरवण्यात आले होते. आवटी यांनी पुण्याजवळील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) प्रमुख, नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख आणि नौदल मुख्यालयातील मनुष्यबळ विभागाचे प्रमुख म्हणून कामगिरी केली होती.

हाडाचे दर्यावर्दी असलेले अ‍ॅडमिरल आवटी सेवानिवृत्तीनंतरही नौदलाच्या कार्याशी संबंधित राहिले. ते मेरिटाइम हिस्ट्री सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते. आरमारी इतिहासाबद्दल त्यांना आस्था होती. नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे आणि कमांडर अभिलाष टॉमी यांच्यासह आयएनएस तारिणी या महिला नौदल अधिकाऱ्यांच्या पथकालाही जगप्रदक्षिणेसाठी अ‍ॅडमिरल आवटी यांनी प्रेरणा दिली होती.