कारवाईच्या भीतीपोटी अनेक आयोजकांचा आखडता हात

राज्य सरकारने दहीहंडीच्या उंचीबाबत कोणताच निर्णय न घेतल्यामुळे सात-आठ थर रचण्याचा सराव करण्यात गोविंदा पथके व्यस्त आहेत. तर त्याच वेळी लाखमोलाचे पारितोषिक असलेल्या दहीहंडय़ा बांधण्यात याव्यात यासाठी गोविंदा पथके आयोजकांकडे खेटे घालत आहेत. असे असले तरी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊन कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये या भीतीपोटी बहुसंख्य आयोजकांनी दहीहंडीपासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गोविंदा पथकांची घागर उताणीच राहण्याची चिन्हे आहेत.

दहीहंडीच्या थरामध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या सहभागावर घातलेली बंदी, दहीहंडी उत्सवासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश आणि दहीहंडीच्या उंचीबाबत निर्माण झालेला संभ्रम यामुळे गेल्या वर्षी मुंबई-ठाण्यातील दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी आखडता हात घेतला होता.

काही वर्षांपूर्वी उंच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांवर लाखो रुपयांच्या पारितोषिकांची उधळण करण्यात येत होती. दिवसभर डीजेच्या ठणठणाटामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत होता. लाखो रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात येत असल्यामुळे मुंबईमधील मोठय़ा गोविंदा पथकांची पावले आपसूकच ठाण्याच्या दिशेने वळू लागली होती. मोठय़ा पथकांच्या पावलावर पाऊल ठेवून समस्त छोटी गोविंदा पथकेही गोपाळकाल्याच्या दिवशी ठाण्याची वारी करू लागली होती. ठाण्यातील आयोजकांच्या पावलावर पाऊल ठेवून मुंबईतही काही नेतेमंडळींनी लाखो रुपये पारितोषिकांच्या दहीहंडय़ा बांधून दिवसभर गोविंदा पथकांना झुंजविण्याचा प्रयत्न केला. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी आयोजकांनी मोठय़ा प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र ठाण्यातील उत्सवाची ओढ लागलेली गोविंदा पथके दुपारनंतर मुंबईत थांबेनाशी झाली होती.

न्यायालयाने दहीहंडीच्या थरामध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या सहभागाला केलेला विरोध, सुरक्षिततेसाठी उत्सवस्थळी उपाययोजना करण्याबाबत दिलेले आदेश आणि दहीहंडीची उंची याबाबत सरकारला दिलेले आदेश यामुळे गेल्या वर्षी बहुसंख्य आयोजकांनी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनातून माघार घेतली होती. यंदाही काहीशी तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

पथकांचे आयोजकांकडे हेलपाटे

गोपाळकाल्याच्या दिवशी गोविंदा पथकासाठी येणारा खर्च दहीहंडी फोटून मिळणाऱ्या पारितोषिकातून भागविण्यात येतो. मात्र गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही आयोजकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गोविंदा पथकांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करावे यासाठी काही गोविंदा पथकांनी आयोजकांकडे खेटे घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु कारवाईच्या भीतीपोटी आयोजक उत्सवाचे आयोजन करण्यास तयार नाहीत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही गोविंदा पथकांची पारितोषिकांची घागर उताणीच राहण्याची चिन्हे आहेत.

गोविंदा पथकांनी भविष्यात केवळ आयोजकांवर अवलंबून राहणे योग्य होणार नाही. येत्या काळात ‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून वर्षभर थर रचण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोविंदा पथकांनी स्वत:च सक्षम होण्याची गरज आहेच.

– सुरेंद्र पांचाळ, सरचिटणीस, दहीहंडी उत्सव समन्वय समिती