मैदानी खेळ, क्रीडा उपक्रम नसल्याने अनेक शाळांकडून बडतर्फी

मानसी जोशी, लोकसत्ता

मुंबई : भविष्यातील खेळाडूंची फळी घडवणाऱ्या क्रीडा शिक्षकांवर टाळेबंदीमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे येथील बहुतेक शाळा ऑनलाइन सुरू झाल्या असल्या तरी क्रीडा शिक्षकांची गरज नसल्याचे कारण देत त्यांना काढून टाकले आहे. अनेक क्रीडा शिक्षकांनी तर उदरनिर्वाहाकरिता भाजी विकणे, कुरियर सेवा अशी कामे धरली आहेत.

टाळेबंदीमुळे चार महिने शाळा बंद होत्या. ऑनलाइन शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक शाळांनी क्रीडाविषयक तासच ठेवलेले नाहीत. क्रीडा स्पर्धा नसल्याचे कारण देत अनेक शाळा आणि क्रीडा संस्थांनी शिक्षकांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच कराराचे नूतनीकरणही केले नाही. अनेक शाळांनी क्रीडा शिक्षकांना काढून टाकल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती कल्याण तालुका क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अविनाश ओंबासे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

काम नसल्याने अनेक शिक्षकांनी भाजी विक्री, कुरियर सेवा, तसेच व्यवस्थापकाची नोकरी पत्करली आहे. सचिन सुतार जोगेश्वरीच्या एका इंग्रजी शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यांचे एप्रिल महिन्याचे वेतनही शाळेने दिले नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी एका खासगी कु रिअर कंपनीत काम करत आहेत. ‘शाळेकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी एप्रिल महिन्याचे वेतन दिले नाही. माझे विरार, जोगेश्वरी येथे कराटेचे प्रशिक्षण वर्ग आहेत. टाळेबंदीमुळे तेही बंद आहेत. शाळा आणि प्रशिक्षण वर्गाचे मिळून २० ते २५ हजार रुपयांची कमाई होत होती. आता कुरियर पोहोचवण्याचे काम करून आठ हजार रुपये मिळतात,’ अशा शब्दांत सुतार यांनी व्यथा मांडली.

एका इंग्रजी शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सागर कावळे डोंबिवलीत भाज्यांची विक्री करत आहेत. ‘विद्यार्थ्यांचे इतर विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. आमच्या कराराचे नूतनीकरण होऊनही शाळेकडून गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबात मीच एकटा

कमावता असल्याने भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहे. यातून दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये मिळत असून या व्यवसायात तोटाच आहे,’ असे सागर कावळे यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे छोटू अहिरे यांचे वेतन रखडले आहे. ते कल्याण येथील शाळेत इंग्रजी आणि शारिरिक शिक्षण हे विषय शिकवतात. वेतन मिळत नसल्याने अहिरे एका गृहसंकुलात व्यवस्थापकाची नोकरी करतात. आम्ही कल्याणला भाडय़ाच्या घरात राहतो. व्यवस्थापकाच्या तुटपुंज्या पगारात महिन्याचा घरखर्च भागतो. माझे फेब्रुवारीपासूनचे घरभाडे थकले असून मालकानेही घरभाडय़ासाठी तगादा लावला असल्याचे त्यांनी सांगितले.

वेतनही अर्धेच, कराराचे नूतनीकरण नाही

टाळेबंदीमुळे क्रीडा स्पर्धाही होत नसल्याने अनेक शाळांनी क्रीडा शिक्षकांच्या कराराचे नूतनीकरण केले नाही. मुंबईतील विविध शाळेत क्रीडा अथवा शारीरिक शिक्षण हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या तीन हजारांवर आहेत. ज्या शाळांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्या शाळांमधील क्रीडा शिक्षकांनाही अर्धे वेतनच मिळत आह