भाजपाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण आणि इतर विषयांसंदर्भात उदयनराजे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच ठोस निर्णय होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंना दिलं. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

राज्यात इतर विषयांबरोबरच मराठा आरक्षणाचा विषय गंभीर बनला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली आहे. यासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उदयनराजे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत उदयनराजे यांनी मराठा आरक्षण आणि इतर विषयांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधले.

मागील काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी दिल्लीत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा भेटीनंतर उदयनराजे यांनी व्यक्त केली होती.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याबरोबरच उदयनराजे भोसले मराठा आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात आग्रही झाल्याचं दिसत आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे’, असं विधान काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले केलं होतं. ‘राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे’, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं अप्रत्यक्षपणे आवाहन केलं होतं. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.