भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘महागर्जना’ सभेसाठी २२ डिसेंबरला मुंबईत जनसागर लोटेल, असे प्रतिपादन करीत भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी शिवसेना व रिपब्लिकन पक्षाचा सहभाग मात्र या सभेत नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) व्यासपीठावर आमच्या या मित्रपक्षांचे नेहमीच स्वागत आहे आणि या सभेनंतर शिवसेनेसोबत संयुक्त अभियान सुरू केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मोदींच्या सभेबाबत जगातील अनेक देशांचेही लक्ष असून ऑस्ट्रेलियासह काही देशांचे उच्चायुक्त व राजदूत उपस्थित राहतील, अशी माहितीही रूडी यांनी दिली.
अमेरिकेच्या दूतावासालाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र देवयानी खोब्रागडे यांना दिलेल्या वाईट वागणुकीबाबत भाजपने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सभेला येणाऱ्यांचे मात्र स्वागत करावे लागेल, असे रूडी यांनी सांगितले. ‘हुंकार’ सभेनंतर आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी ‘महागर्जना’ सभेचे आयोजन भाजपने केले आहे. राज्यातील व केंद्रातील अनेक नेते, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली असून लाखो कार्यकर्ते व सर्वसामान्य व्यक्ती मुंबईत येतील. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे रूडी यांनी नमूद केले. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मुंबईत येणाऱ्या शेकडो गाडय़ा अडवू नयेत. विरोधी पक्षांच्या सभेत राजकीय दबावातून कोणताही अडथळा आणू नये, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
सभेसाठीची तयारी
*दर तीन-चार दिवसांनी करण्यात आले तब्बल एक कोटी एसएमएस व  पाच लाख ई-मेल
* कार्यकर्ते व अन्य कुटुंबांमधून पाच लाख भोजन पाकिटे व पाच लाख ठेपले सभेसाठी येणाऱ्यांना पुरविणार
* राज्यभरातून २२ विशेष रेल्वेगाडय़ांमधून कार्यकर्ते येणार
* तीन लाख बूथ कार्यकर्ते मुंबईत येणार
* मिस कॉल नोंदवून ६० हजार जणांचा सहभाग
* सोशल मीडीयावरही सभेसाठी हजारोंची नोंदणी
* एमएमआरडीएची सहाही मैदाने व त्यांना जोडणारा रस्ता आदी सर्व परिसर सभेसाठी वापरणार
* पार्किंग व्यवस्थेसाठी परिसरातील तीनही मैदाने व दोन रस्त्यांचा वापर
* सुरक्षेसाठी आयबी, एनएसजी, गुजरात व महाराष्ट्र पोलिस यांची यंत्रणा सज्ज
* सुरक्षेसाठी पोलिसांना सर्वतोपरी मदत. खासगी सुरक्षा रक्षकांचाही वापर, सीसीटीव्हीही बसविणार