भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर आहेत. देशातील म्युच्युअल फंडांची गंगाजळीही सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. आर्थिक प्रगतीची अन्य मानके नांगी टाकत असली तरी गुंतवणुकीच्या या पर्यायांची कामगिरी लोभसवाणी असल्याचे दिसून येते.

म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून चांगल्या परताव्याचे हे समीकरण कसे साधावयाचा याचे मार्गदर्शन रविवार, १५ डिसेंबर २०१९ रोजी  ‘लोकसत्ता अर्थभान’ उपक्रमातून केले जाणार आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हे गुंतवणूक मार्गदर्शनाचे सत्र सायंकाळी ६ वाजता सुभेदार वाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम) येथे होईल.

या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. तसेच काही जागा निमंत्रितांकरिता राखीव असतील. उपस्थित तज्ज्ञ मार्गदर्शकांना थेट प्रश्न विचारून, गुंतवणूकदारांना या कार्यक्रमात त्यांच्या शंकांचे निरसन करून घेण्याची संधी उपलब्ध असेल.

आर्थिक सल्लागार तृप्ती राणे या म्युच्युअल फंडविषयी या वेळी मार्गदर्शन करतील. फंड, समभाग, रोखे गुंतवणुकीची सांगड तसेच त्यांचे विविध प्रकार, गुंतवणूक केव्हा करावी, केव्हा बाहेर पडावे आदीबाबत त्या सांगतील. विविध क्षेत्रे व त्यांच्याशी निगडित फंड योजना, त्यातील परतावा हेही यानिमित्ताने सोदाहरणासह उलगडून सांगितले जाईल.

त्याचबरोबर सध्य वित्तस्थितीत अपेक्षित आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक नियोजनाबाबत अर्थशास्त्राचे प्राध्यापक व वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी हे प्रकाश टाकतील. वयाच्या विविध टप्प्यांत, विविध आर्थिक लक्ष्यांच्या पूर्ततेसाठी योग्य निर्णय कसे घेता येतील, हेही ते सांगतील.

कधी?

रविवार, १५ डिसेंबर २०१९

सायंकाळी ६ वाजता

कुठे?

सुभेदारवाडा विद्यासंकुल, गांधी चौक, कल्याण (पश्चिम)

मार्गदर्शक व विषय

तृप्ती राणे – म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ

कौस्तुभ जोशी – अर्थनियोजन महत्त्वाचे