मुंबई : गेल्या आठवडय़ात मुंबईसह कोकणातील कमाल तापमानात झालेल्या मोठय़ा वाढीच्या पाश्र्वभूमीवर येत्या चार दिवसात मात्र तापमानात फार मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. ९ मार्चनंतर तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवडय़ात मुंबईसह किनारपट्टीवर कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. त्यानंतर तापमानात घट झाली असून, पुढील चार दिवस मुंबईसह कोकणचे कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १६-१८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात हा बदल ४८ तासानंतर होण्याची शक्यता आहे. उर्वरीत महाराष्ट्रात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या वर राहू शकते.

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा ३० अंशाच्या वरच राहीला. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. विदर्भाच्या काही भागात सोमवारी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ, तर मराठवाडय़ात किंचित घट झाली.