सराईत अमली पदार्थ विक्रेता अटकेत; बहुतांश ग्राहक महाविद्यालयीन तरुण

एमडी या अत्यंत घातक अमली पदार्थाचा पुरवठा अंधेरी आणि अन्य पश्चिम उपनगरांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत करणाऱ्या आसीफ इक्बाल खान ऊर्फ चुहा या सराईत तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे कक्षाने अटक केली. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे एमडी हस्तगत करण्यात आले. चौकशीदरम्यान बहुतांश ग्राहक महाविद्यालयीन तरुण असल्याची कबुली आसीफने दिली. विशेष म्हणजे त्यांच्यापर्यंत एमडीच्या पुडय़ा पोहोचवण्यासाठी आसिफ शालेय विद्यार्थ्यांचा वापर करत होता.

पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक अनिल वाढवणे आणि सहकाऱ्यांनी आसिफला अंधेरीच्या गावदेवी डोंगर येथून अटक केली. गेल्या काही दिवसांपासून तेथील रहिवाशांच्या आसिफविरोधातील तक्रारी पुढे येत होत्या. आसिफच्या पुरवठय़ामुळे परिसरातील अनेक तरुणीही एमडीच्या आहारी गेल्या होत्या.

२०१२मध्ये पथकाच्या वरळी कक्षाने आसिफला गांजाच्या मोठय़ा साठय़ासह अटक केली होती. सुमारे अडीच वष्रे चाललेल्या खटल्यातून तो निर्दोष सुटला. कारवाई आणि खटल्याचे कामकाज यातून त्याने शिकवण घेतली आणि ग्राहकांपर्यंत अमली पदार्थाच्या पुरवठय़ासाठी नवी पद्धत सुरू केली. एमडीसाठी असंख्य ग्राहक आसिफच्या संपर्कात होते. त्यातील बहुतांश ग्राहक हे अंधेरी आणि आसपासच्या उपनगरातील महाविद्यालयातील तरुण होते. ते आसिफला मोबाइलवर संपर्क साधत, एमडीची मागणी करत. आसिफ त्यांना एका ठिकाणी बोलवे. तेथे स्वत: न जाता लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना पैसे, खाऊचे आमिष दाखवून एमडी घेऊन ग्राहक विद्यार्थ्यांकडे पाठवे. ग्राहक विद्यार्थ्यांला लहान मुलांचा फोटो किंवा त्याने परिधान केलेल्या कपडय़ांचे वर्णन सांगे.

अमली पदार्थाचा साठा सोबत असताना अटक घडल्यास निर्दोष सुटणे कठीण होते किंवा न्यायालयात पोलिसांची बाजू भक्कम होते, हे ठाऊक असल्याने आसिफने लहान मुलांचा वापर केल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली.

आरोग्य सेविकेच्या गणवेशात गांजाची तस्करी

अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक निनाद सावंत आणि सहकाऱ्यांनी वरळी किनाऱ्यावरून लता चौरे आणि राणी बरसैया या दोन महिलांना १५ किलो गांजासह अटक केली. यापैकी लता नाशिकची रहिवासी आहे.

आठवडय़ातून दोन वेळा ती गांजाचा साठा नाशिकहून मुंबईत आणे आणि राणीसह अन्य महिला विक्रेत्यांना देत असे. लता नाशिक ते मुंबई प्रवासादरम्यान आरोग्य सेविकांचा विशेषत: पोलिओ डोस पाजणाऱ्या सेविकांप्रमाणे पोशाख चढवित होत्या. त्या पोशाखाआड गांजाचा साठा दडवून मुंबईत आणायच्या  आरोग्य सेविकेचा पोशाख असल्यामुळे पोलिसांची नजर चुकवून गांजाची सहज तस्करी करता येते, असा तिचा समज होता.