विधान मागे घेण्याची मागणी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वैद्यकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या विरोधात निषेधाचा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने (आयएमए) राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे.

‘मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही, कंपाऊंडरकडून घेतो. त्याला जास्त कळतं,’ असे वक्तव्य संजय राऊत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. राऊत यांच्या विधानामुळे डॉक्टरांचा अपमान झाला आहे. त्यामुळे राऊत यांनी हे विधान चुकभूलीने झाल्याचे मान्य करत मागे घ्यावे, अशी मागणी करणारा निषेध प्रस्ताव मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि शिवसेनेलाही पाठविणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

राजकीय मनोरंजनासाठी डॉक्टरांचा अशा पद्धतीने तमाशा करू नका. करोना उद्रेकाच्या काळात गेले पाच महिने डॉक्टर अखंड सेवा देत आहेत. त्यांची अशी हेटाळणी होणे योग्य नाही. अशा वागणुकीमुळेच डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मोठे मनुष्यबळ परराज्यांत, परदेशाकडे वळत आहे. सत्तेसोबत जबाबदारीने वागत राऊत यांनी आपल्या वाचेवर नियंत्रण ठेवावे, या शब्दांत बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी नाराजी व्यक्त केली.

राऊत यांच्या वक्तव्याविषयी अनेक मिम्सही समाजमाध्यमावर फिरत आहेत. राऊत डॉक्टरकडे जात नाहीत, तर त्यांची अँजियोप्लास्टी कंपाऊंडरने केली का, असा प्रश्नही मिम्सद्वारे उपस्थित केला जात आहे.