ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पुन्हा एकदा विषयपत्रिका वाचण्यावरून निर्माण झालेल्या गोंधळात सत्ताधारी शिवसेनेने मंजुरी देऊन सभा संपवली. यामुळे आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाने महापौर संजय मोरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच कोटय़वधीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी मोरे यांनी गोंधळात चर्चेविनाच विषयपत्रिकेला मंजुरी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केला आहे. मात्र, महापौरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
सोमवारच्या सभेत महापालिकेच्या विषयपत्रिकेवर चर्चा सुरू असतानाच महापालिकेच्या हद्दीतील मलनि:सारण जोडणी शुल्क व रस्ता फोड शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला. त्या वेळी राष्ट्रवादीचे हिरा पाटील यांनी या मुद्दय़ाला धरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय मोरे यांनी त्यास मंजुरी देत पुढचा विषय वाचण्याचे आदेश प्रभारी सचिव अशोक बुरपुले यांना दिले. या मुद्दय़ावरून विरोधी पक्षाने मोरे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. सचिवांनी गोंधळातच विषयपत्रिकेचे वाचन करताच सत्ताधारी शिवसेनेने त्या विषयपत्रिकेला मंजुरी दिली. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली.
आरोप-प्रत्यारोप
मोबाइल कंपन्यांना रस्ते खोदण्यासंबंधी दिलेल्या परवानगीच्या विषयावर चर्चा करायची होती आणि त्यातील भ्रष्टाचार उघड करायचा होता. मात्र, महापौरांनी चर्चा करणे टाळले.  कोटय़वधीचा भ्रष्टाचार उघड होईल म्हणून तो लपविण्यासाठी मोरे यांनी गोंधळातच विषयपत्रिकेला मंजुरी दिली, असा आरोप हणमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, मोरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

‘पदपथावर गुंडांचे राज्य’
ठाणे येथील गोखले मार्गावरील पदपथावर काही गुंड पाच ते दहा हजार रुपये घेऊन फेरीवाल्यांना बसवितात. तसेच शहरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करायची नाही म्हणून महापालिका प्रशासन फेरीवाला धोरणाचा बाऊ करीत आहे, असा आरोप महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सोमवारच्या सर्वसाधारण सभेत केल्याने एकच खळबळ उडाली. तसेच फेरीवाल्यांच्या शुल्कातून मिळणारे उत्पन्न नको, आधी फेरीवाल्यांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, याप्रकरणी महापौर संजय मोरे यांनी तातडीने शहरातील रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.

ठाणे परिवहन भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर
ठाणे: ठाणे परिवहन उपक्रम बस प्रवासी भाडेवाढीच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत  गोंधळादरम्यान अंतिम मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार किमान दोन, तर कमाल सहा रुपयांची भाडेवाढ सहन करावी लागणार आहे. आता हा प्रस्ताव ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर ही दरवाढ लागू होणार आहे.  परिवहन उपक्रमाला महिन्याकाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. नवीन भाडे तक्त्यानुसार बसच्या तिकीट दरात दोन रुपयांनी, तर वातानुकूलित बसच्या दरात पाच रुपयांनी वाढ होणार आहे. प्रत्येक टप्प्यासाठी दोन रुपयांची भाडेवाढ, तर १० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास झाल्यास तीन रुपये आणि २५ किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास झाल्यास सहा रुपयांपर्यंत अधिक पैसे मोजावे लागणार आहे.