आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी कारवाईची मागणी

मुंबई : उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी आदेश देऊनही कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ चे काम रात्रीच्या वेळेस केले जाते, या कामामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण केंद्रही स्थापन करण्यात आलेले नाही, असा आरोप करणारी अवमान याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच ‘एमएमआरसीएल’ आणि ‘एल अ‍ॅण्ड टी’ या कं पन्यांवर अवमान कारवाई करण्याची मागणी के ली गेली आहे. न्यायालयानेही एमएमआरसीएल आणि ‘एल अ‍ॅण्ड टी’ला याचिके वर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्याचा काळ हा परीक्षांचा असून प्रकल्पांच्या कर्णकर्कश आवाजात मुले कसा काय अभ्यास करणार, असा मुद्दाही याचिकाकत्र्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला. तसेच याचिकेवरील सुनावणी तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या मुद्द्याची दखल घेत याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे.

मेट्रो-३ या भुयारी प्रकल्पाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. रात्रीच्या वेळी प्रकल्पाचे काम केले जाते. त्यामुळे दिवस-रात्र परिसरात केवळ मेट्रोच्या कामाचाच आवाज असून शांततेत जीवन व्यतीत करण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करणारी याचिका दक्षिण मुंबईस्थित वकील रॉबिन जयसिंघानी यांनी केली होती. त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने एमएमआरसीएलला रात्री १० ते सकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रोचे काम न करण्याचे आदेश दिले होते. काम सुरू असलेल्या परिसरातील ध्वनीची पातळी दिवसा ५५ डेसिबलपेक्षा, तर रात्रीच्या वेळी ४५ डेसिबलपेक्षा जास्त जाणार नाही, असेही स्पष्ट केले होते. प्रकल्पामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याचेही न्यायालयाने म्हटले होते. तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी हमी एमएमआरसीएलच्या वतीने महाधिवक्त्यांनी दिली होती. तक्रार आल्यानंतर तातडीने त्यावर कारवाई करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

जुलै आणि ऑगस्ट २०१८ मध्ये न्यायालयाने दिलेल्या एकाही आदेशाची एमएमआरसीएल आणि कंपनीने अंमलबजावणी केलेली नाही. परिणामी परिसरात दिवसरात्र कमालीचे ध्वनिप्रदूषण होत असते. शिवाय तक्रार करूनही त्यावर काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे एमएमआरसीएल आणि कंपनीविरोधात अवमान कारवाई करण्याची मागणी याचिकाकत्र्याने केली आहे.