अवैध आर्थिक व्यवहारांचाही पोलिसांकडून तपास

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर खरोखरच हल्ला झाला की तो बनाव होता याचा तपास मानखुर्द पोलिसांकडून सुरू आहे. त्यानिमित्त मानखुर्द येथील ६७ एकर भूखंडावर सुरू असलेल्या मेट्रो कारशेड प्रकल्पातील कंत्राटांचे वाटप, कंत्राटदारांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आणि बेकायदा आर्थिक व्यवहारांची माहितीही पोलीस घेत आहेत. त्यातून बरीच धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

मानखुर्द परिसरात १२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सशस्त्र हल्लेखोरांनी काते यांच्यावर हल्ला केला. एका आरोपीने कातेंवर तलवारीने केलेला वार किरण सावंत उर्फ सुनील या शिवसैनिकाने हाताने रोखला. पुढे पोलीस अंगरक्षकाने पिस्तूल बाहेर काढताच हल्लेखोर पसार झाले, अशी तक्रार मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल आहे. तलवारीचा वार रोखणाऱ्या सावंतच्या हातावरील जखमेचे स्वरूप, चौकशी व तपासादरम्यान पुढे आलेल्या माहितीमुळे हल्ला खरोखरच घडला का, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र या हल्ल्याची पाळेमुळे जवळच सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या भरणीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुरमाची भरणी घालून भूखंड समतल करण्याचे काम सुरू आहे. हे कंत्राट खासगी कंपनीकडे आहे. साधारण तीन ते चार लाख डम्पर मुरूम पडल्यावर भूखंड समतल होईल, असा अंदाज आहे. मात्र मुरुम किंवा माती घेऊन येणाऱ्या प्रत्येक डम्पर चालकाकडून सुमारे ८०० रुपये घेतले जातात. पैसे घेतल्यानंतरच डम्परचालकाला भरणी घालण्यासाठी आत सोडले जाते. कातेंवरील हल्ल्यानंतर सध्या भरणीचे काम बंद असले तरी त्यापूर्वी येथे दिवसाला ७००-८०० डम्पर रिते केले जात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

इमारत उभारण्यापूर्वी पाया खोदताना माती बाहेर काढली जाते. पाया खोदणाऱ्या कंत्राटदारावर मातीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असते. महापालिकेचे निर्बंध असल्याने माती मुंबईबाहेर टाकावी लागते.

कोण किती ‘खड्डय़ा’त

चेंबूर, माहूल, मानखुर्द, गोवंडीत सुरू असलेल्या बहुतेक सर्वच बांधकाम प्रकल्पांत खड्डा खोदण्याचे कंत्राट लोकप्रतिनिधींचे कुटुंबीय, नातेवाईक किंवा निष्ठावान कार्यकर्त्यांकडे आहे. ही माती मेट्रो कारशेड प्रकल्पात एकही पैसा न देता टाकण्याचा लोकप्रतिनिधींचा हट्ट आणि अन्य डम्पर फेऱ्यांमध्ये ठरलेली टक्केवारी कातेंवरील हल्ल्याच्या मुळाशी आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.