पश्चिम द्रुतगती मार्ग, एलबीएस मार्गावर सर्वाधिक कोंडी

मुंबई : पूर्व उपनगरे जोडणारा लालबहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सुरू असलेली मेट्रोची कामे आणि त्यात लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीत पडलेली भर यांमुळे सकाळ-संध्याकाळ कार्यालयीन वेळेत या दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

टाळेबंदी टप्प्याने सैल होत असली तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. परिणामी रोजगारासाठी घराबाहेर पडणाऱ्या श्रमिकांना बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी ही वाहतूक व्यवस्था अपुरी किंवा वेळखाऊ ठरते. परिणामी अनेक अधिकारी, कर्मचारी, कामगार खासगी वाहनांनी प्रवास करत आहेत. रस्त्यांवर खासगी वाहने मोठ्या संख्येने उतरत असल्याने कोंडी वाढली आहे. त्यात मुलुंड ते शीव जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेला एलबीएस आणखी आक्रसला. सकाळी दक्षिणेकडे (शीव, दादरकडे) जाणारी, तर संध्याकाळी उत्तरेकडे (मुलुंड, ठाण्याकडे) जाणारी वाहतूक अरुंद एलबीएसवर ठिकठिकाणी तुंबते. विक्रोळीच्या गांधीनगर चौकातून भांडुपच्या सोनापूर चौकात जाण्यासाठी दुचाकीस्वारांना एक ते दीड तास लागतो. प्रत्यक्षात हे अंतर १५ ते २० मिनिटांचे आहे.

विशेष म्हणजे मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या कं त्राटदारांनी रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या संरक्षक भिंतीमुळे (पत्र्याची) या मार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले आहेत. या मार्गाला येऊन मिळणाऱ्या अन्य रस्त्यांवरून येणारी वाहने किंवा रस्ता ओलांडणारे पादचारी संरक्षक भिंतींच्या उंचीमुळे दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे हे अपघात होतात, असे स्थानिक पोलीस, वाहतूक पोलिसांनी सांगितले.

या मार्गावरून सतत वाहतूक सुरू असल्याने माती उचलून नेणे किं वा अन्य वस्तू उतरवून घेणे ही कामे करताना कं त्राटदारांना मर्यादा येतात. एका कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, माती वाहून नेणे किं वा वस्तू उतरवून घेण्यासाठी क्रेन, मालवाहू ट्रक संरक्षक भिंतींआत घेणे शक्य नाही. आधीच हा मार्ग अरुंद असल्याने क्रेन, ट्रक रस्त्यावर उभा के ल्यास वाहतूक तुंबते.

पश्चिम द्रुतगती मार्गावरही तीन ते चार ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या मार्गिके वरील स्थानकांच्या उभारणीसाठी द्रुतगती मार्गाचा जास्त भाग व्यापण्यात आला आहे. परिणामी येथील मार्ग अरुंद बनला असून सकाळी दहिसरहून वांद्रेकडे आणि संध्याकाळी वांद्रेहून दहिसरकडे येणारी वाहने या ठिकाणी खोळंबतात.

अपघातांना निमंत्रण

दोन आठवड्यांपूर्वी मेट्रोच्या कामासाठी गांधीनगर चौकाजवळ लोखंडी सळ्या उतरवून घेण्याचे काम सुरू होते. तेव्हा एक भरधाव बेस्ट बस सळ्या वाहून आणणाऱ्या ट्रकवर आदळली. या अपघातात बेस्ट चालक थोडक्यात बचावला. मात्र त्याच्या पायात सळ्या घुसल्याचे समजते.