News Flash

महाराष्ट्रात प्रथमच कासवांवर ‘मायक्रोचिपिंग’ प्रयोग

अथांग समुद्रात विहार करणाऱ्या सागरी कासवांच्या शास्त्रीय माहितीचा उलगडा होण्याकरिता हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जागतिक कासव दिन विशेष

जखमी समुद्री कासवांना उपचारानंतर समुद्रात सोडण्यापूर्वी त्यांच्या शरीरात तांदळाच्या दाण्याएवढी मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. डहाणू येथील महाराष्ट्रातील एकमेव कासव शुश्रूषा केंद्रामध्ये यंदा पावसाळ्यात उपचार होणाऱ्या कासवांवर हा प्रयोग केला जाणार आहे. मुख्य म्हणजे अशा पद्धतीचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग मानला जात आहे. त्यामुळे अथांग समुद्रात विहार करणाऱ्या सागरी कासवांच्या शास्त्रीय माहितीचा उलगडा होण्याकरिता हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर कासव संवर्धन आणि त्यासंबंधी ठोस शास्त्रीय माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी टर्टल, हॉक्सबिल आणि लॉगरहेड टर्टल अशी चार प्रजातीची समुद्री कासवे राज्यातील सागरी परिक्षेत्रात आढळतात. पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात जखमी आणि अर्धमेली कासवे वादळी लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्यावर येत असतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी राज्यात केवळ डहाणू येथे सी-टर्टल ट्रीटमेंट अ‍ॅण्ड ट्रान्झिट सेंटर हे एकमेव केंद्र आहे. वनखात्याच्या सहकार्याने येथील ‘वाइल्ड लाइफ कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’ या संस्थेतर्फे या केंद्राचे काम पाहिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात कें द्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या कासवांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कें द्रामध्ये दाखल झालेल्या सुमारे ३५ कासवांपैकी  १५ कासवांचे प्राण वाचवून त्यांना सोडण्यात आले होते.

मात्र येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असल्याने या क्रेंद्रात मोठय़ा संख्येने जखमी आणि अर्धमेली सागरी कासवे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा जखमी कासवांना समुद्रात सोडण्यापूर्वी त्यांच्या शरीरात युनिवर्सल मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय डहाणू वन विभागाने घेतला आहे. यासाठी ५० मायक्रोचिप खरेदी करण्यात येणार असून एका मायक्रोचिपची किमंत ९०० रुपये आहे. तर या चिपमधील सांकेतिक क्रमांक ओळखणाऱ्या मायक्रोचिप रीडरची किंमत सुमारे १५ ते १८ हजार रुपये आहे. तांदळाच्या दाण्याएवढय़ा असणाऱ्या या मायक्रोचिपवर एक विशष्ट सांकेतिक क्रमांक असतो आणि ती चिप कासवाचे पर किंवा कवचाखालील त्वचेच्या पोकळीमध्ये बसविली जाते. कासवाला समुद्रात सोडताना त्याच्या शारीरिक परिस्थितीच्या माहितीचे जतन सांकेतिक क्रमांकानुसार त्यामध्ये केले जाते. असे चिप बसविलेले कासव दुसऱ्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यास मायक्रोचिप रीडरच्या साहाय्याने त्याच्या सांकेतिक क्रमांकाची माहिती मिळवता येते. केंद्रामध्ये उपचार झाल्यानंतर कासवांना समुद्रामध्ये सोडताना त्यांचावर युनिव्हर्सल मायक्रोचिप बसविण्यात येणार असल्याने ते कासव भविष्यात इतर राज्यांच्या किनाऱ्याला लागल्यास त्याची माहिती मिळणे सोपे जाईल, अशी माहिती या केंद्राचे पशुवैद्य आणि कासवतज्ज्ञ डॉ. दिनेश विन्हेरकर यांनी दिली.

कासव शुश्रूषा केंद्राच्या विकासाच्या दृष्टीने शास्त्रीय माहितीचे संकलन करण्यासाठी मायक्रोचिप प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी ५० मायक्रोचिप आणि रीडरची खरेदी करण्यात येणार असून पुढील महिन्यापासून हा प्रयोग सुरू करण्यात येणार आहे.

नानासाहेब लडकत, उप-वनसंरक्षक, डहाण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 3:48 am

Web Title: microchipping experiments on tortoise in maharashtra
Next Stories
1 अकरावीच्या साडेनऊ हजार जागा वाढणार
2 इंधनदरवाढीची भाज्यांना झळ
3 पालिका रुग्णालयात औषध दुकानाची मक्तेदारी
Just Now!
X