मिसळ असं नुसतं म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्रातील मराठमोळा असा हा पदार्थ म्हणजे खऱ्या अर्थाने लज्जतदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मिसळींचे वैशिष्ट्यही वेगवेगळे. त्या मिसळीला तिथली अशी स्पेशल चव असतेच. मग ती कोल्हापूरची लालभडक-झणझणीत मिसळ असेल, नाशिकची काळ्या मसाल्याची मिसळ असेल किंवा पुण्याची बटाट्याची भाजी घालून केलेली मिसळ असेल. अशा महाराष्ट्रभरातील मिसळ चाखण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. माटुंगा येथे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत खास मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे.

पश्चिम माटुंग्यातील मोगल लेन येथे तीन दिवसांच्या ‘मनसे मिसळ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर,संगमेश्वर येथील मिसळींचे स्टॉल असतील. शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. “महाराष्ट्रातील विविध भागांतील मिसळची चव मुंबईकरांना एकाच ठिकाणी अनुभवता यावी, यासाठी या मिसळ महोत्सवाचे आयोजन आम्ही केले आहे. असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

अहमदनगरची मारोतराव मिसळ, नाशिकची माऊली मिसळ, कोल्हापूरची अभिची मिसळ, संगमेश्वरची मुळ्येंची मिसळ, साता-याची इनामदार मिसळ, ठाण्यातील मामलेदार मिसळ, अशा अनेक ठिकाणच्या ख्यातनाम मिसळींचे स्टॉल या ठिकाणी असतील असेही सरदेसाई यांनी सांगितले. शनिवार व रविवार हे दोन्ही दिवस खवय्यांना सकाळी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत चमचमीत तर्रीदार मिसळींचा आस्वाद घेता येईल.