24 November 2017

News Flash

देवनार, गोवंडी विकासासाठी सचिन तेंडुलकरचे ‘मिशन-२४’

खासदार सचिन तेंडुलकरने पालिका मुख्यालयात मंगळवारी ‘मिशन-२४’ची घोषणा केली.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 13, 2017 4:03 AM

‘मिशन-२४’च्या फलकाचे सचिन तेंडुलकर, आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते अनावरण झाले.    (छाया : निर्मल हरिंद्रन)

मुंबईमधील दुसऱ्या क्रमांकाची झोपडपट्टी म्हणून ओळख बनलेल्या देवनार, शिवाजीनगर, गोवंडी परिसराच्या विकासाबरोबरच मुलांना शिक्षण, नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी ‘अपनालय’ आणि ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थांनी संयुक्तरीत्या ‘मिशन-२४’ योजना आखली असून ही योजना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मंगळवारी जाहीर केली. या योजनेअंतर्गत या विभागामधील नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

मुंबईमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या काही कचऱ्याची देवनार येथील कचराभूमीत विल्हेवाट लावली जाते. मात्र कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्यामुळे या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच या विभागात आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यामुळे या विभागातील आरोग्य, शिक्षण आणि कचरा आदी प्रश्नांवर ‘अपनालय’ आणि ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थांनी लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन ‘अपनालय’ आणि ‘मुंबई फर्स्ट’ने देवनार, शिवाजीनगर, गोवंडी परिसराचा विकास करण्यासाठी ‘मिशन-२४’ ही योजना आखली आहे. खासदार सचिन तेंडुलकरने पालिका मुख्यालयात मंगळवारी ‘मिशन-२४’ची घोषणा केली. यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते. दुसऱ्या क्रमांकाची झोपडपट्टी म्हणून शिवाजीनगर ओळखले जात आहे. काही दिवसांपूर्वी या भागाची पाहणी करताना अनेक गोष्टी खटकल्या. त्यावर तोडगा काढण्याचा ‘मिशन-२४’अंतर्गत प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘स्वच्छता दूत’ या नात्याने आपण या योजनेसाठी सर्वतोपरीने मदत करण्यास तयार आहोत, असे सचिन तेंडुलकरने यावेळी सांगितले. आजही अनेक नागरिक घराच्या खिडकीमधून सर्रास कचरा फेकतात. या प्रकारांना आळा बसायला हवा. समाजात एखादा बदल एका दिवसात होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे काम कठीण आहे, पण अशक्य नाही. काही दिवसांपूर्वी मी देवनारला भेट दिली होती. देवनार कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला सर्वानाच ‘स्वच्छता दूत’ बनावे लागेल, असे आवाहन सचिनने मुंबईकरांना केले.

First Published on September 13, 2017 4:03 am

Web Title: mission 24 project launch by sachin tendulkar for deonar govandi development