‘लोकसत्ता‘चे हर्षद कशाळकर यांच्यावरील हल्ला प्रकरण; राज्यभरातील पत्रकारांकडून निषेध

‘लोकसत्ता‘चे रायगड प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रात घुसून केलेल्या भ्याड हल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निधेष करीत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना २३ मे रोजी अलिबाग येथील मतमोजणी केंद्रात शेकापचे आमदार जयंत पाटील,आमदार सुभाष पाटील आपल्या काही साथीदारांसह अधिकृत प्रवेशपत्र नसताना शिरले व त्यांनी पोलिसांसमोरच कशाळकर यांना मारहाण केली होती. संबंधित हल्लेखोरांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. पण या हल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटू लागले असून हल्लेखोर आमदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्यातील पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कशाळकर यांच्यावरील हल्ल्याचा  मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  नरेंद्र वाबळे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

एखाद्या वृत्तपत्र प्रतिनिधीवर अशाप्रकारे हल्ला होणे, ही लाजिरवाणी बाब आहे. सरकारने या घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन  जयंत पाटील आणि त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी‘, अशी मागणी वाबळे यांनी पत्रकाव्दारे केली आहे. कशाळकर यांच्यावरील हल्लय़ाचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील पत्रकार सोमवारी सकाळी  जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा नेणार आहेत. या मोर्चाला मुंबई मराठी पत्रकार संघाने संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. याप्रकरणी लोकसत्ता आणि हर्षद कशाळकर यांच्यामागे पत्रकार संघ खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही देखील या पत्रकात देण्यात आली आहे. मुंबई प्रेस क्लबनेही या हल्याचा निषेध केला असून या घटनेची सखोल चौकशी करून हल्लेखोर आमदारांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी मागणी संस्थेच्या सचिव लता मिश्रा यांनी केली.

प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कायम जनमानसाचे योग्य चित्रण मांडण्याचा प्रयत्न होत असतो. हा प्रयत्न काही जणांना फारच झोंबल्यानंतर शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासारखी आततायीपणाची कृती होत असते असे सांगत कशाळकर यांना झालेल्या मारहाणीचा ठाणे दैनिक पत्रकार संघानेही निषेध केला आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे हे वागणे निश्चित निंदनीय आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या मुजमेर नेते मंडळीचा जाहीर निषेध करीत असल्याचे संघाचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघानेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला .लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर लोकशाहीतीलच एक घटक असलेल्या लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे हल्ला करणे हे लोकशाहीलाच घातक आहे.पत्रकारिता करतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेल्या पत्रकारास आपल्या वर्तमानपत्रातून वस्तूस्थिती मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे व तोच अधिकार  कशाळकर यांनी वापरला आहे. मात्र निवडणूकीत आपल्या पक्षाची सुमार कामगिरी सहन न झाल्याने आमदार पाटील यांनी चक्क पत्रकारावर हात उचलला .जयंत पाटील यांनी केलेल्या या भ्याड हल्लय़ाचा निषेध करतांनाच त्यांना अटक करुन त्यांचेवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करावा.  या घटनेची राज्य सरकार व राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी गांभीर्य पुर्वक दखल घेऊन त्याचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द करावे,अशी मागणी संघाचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे.  कशाळकर यांना झालेल्या मारहाणीचा सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाने निषेध केला आहे. निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आमदार पाटील आणि त्यांच्या पाठीराख्याना त्वरित अटक करावी अशी मागणी संघाचे जालिंदर हुलवना आणि मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी केली आहे. कशाळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने त्वरित कारवाई करावी अशी मागणी भिवंडी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद भसाळे, महाराष्ट्र श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिपकुमार मैत्र, नागपूर श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे देखील या प्रकाराचा निषेध करण्यात आला . तसेच या प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस पांडुरंग सांडभोर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे.