विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची मुदत आहे. त्यामुळे ह सर्व उमेदवार आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निवडणूक असल्याने सत्ताधारी युतीच्या चारही जागा निवडून येणार आहेत.  
पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांची विधानसभेवर निवड झाल्याने तर विनायक मेटे यांना अपात्र ठरविण्यात आल्याने विधान परिषदेच्या रिक्त चार जागांसाठी ३० तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. तावडे आणि शेलार यांच्या राजीनाम्याने रिक्त जागा भरण्यासाठी दोन स्वतंत्र पोटनिवडणुका होतील.
भाजपचे १२१ आणि शिवसेना ६३ यासह छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता सत्ताधाऱ्यांकडे १९०च्या आसपास मते आहेत. म्हणजेच दोन जागांसाठी मतदान झाले तरीही भाजप-शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. चारही जागा सत्ताधारी युतीला मिळणार आहेत. रिपब्लिकन पक्ष आठवले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष तसेच विनायक मेटे यांची संघटना या चार जणांनी भाजपला पाठिंबा दिला होता. या चारही मित्रपक्षांना सत्तेत वाटा देण्याची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली होती.
शिवसेनेची कोंडी ?
चारपैकी दोन जागांची मुदत जुलै २०१६ पर्यंत आहे. म्हणजेच निवडून येणाऱ्या दोघांना पुढील वर्षी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. या दोन जागा मित्र पक्षांच्या गळ्यात मारून त्यांना पुन्हा दबावाखाली ठेवण्याची भाजपची योजना असू शकते.