‘शिवसेना महापालिकेमध्ये सत्तेत असली तरी मेट्रोसाठी कापण्यात आलेल्या झाडांशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. राज्याचे पर्यावरणमंत्री शिवसेनेचे असले तरी मेट्रोसंदर्भातील एकही निर्णय राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही. मेट्रोसाठी होणारी वृक्षतोड ही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एमएमआरसीएलने केली आहे’ अशी भूमिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. एका खासगी वेबसाईटसाठी लिहिलेल्या ब्लॉगमधून आदित्य यांनी आरेसंदर्भात शिवसेनेवर होत असलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडली आहे.

उच्च न्यायालयाने शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रोजी आरे येथे मेट्रो ३ च्या कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये प्रशासनाने वृक्षतोड करण्यास सुरुवात केली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिकेद्वारे या प्रकरणाची दखल घेत वृक्षतोड थांबवण्यास सांगितली. मात्र यावेळी सरकारने आवश्यक असणारी सर्व झाडे तोडल्याचे न्यायलयात सांगितले. वृक्षतोड करण्यासाठी प्रशासनाने दाखवलेल्या तात्परतेवरुन अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर आश्चर्य व्यक्त करत या घाईघाईत करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. आरेतील मेट्रो कारशेडबाहेर शेकडो पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. या सर्वांमध्ये महानगरपालिकेमध्ये आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचाही टीकाकारांनी चांगलाच समाचार घेतला. आरेतील एकाही झाडाला हात लावू देणार नाही अशी भूमिका घेणारे आदित्य ठाकरे कुठे आहेत असा सवाल अनेकांनी ही वृक्षतोड झाल्यानंतर केला. आता आदित्य ठाकरे यांनी ब्लॉगमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘मेट्रो तीन प्रकल्प चालवणाऱ्या एमएमआरसीएल मुंबईमधील झाडे पाडत आहे. एमएमआरसीएलच्या हट्टीपणामागील कारण मला समजू शकलेले नाही. लोकांशी खोट बोलून पर्यावरणाची हानी करुन ते विकास साधत असल्याचे सांगत आहेत,’ अशी टीका आदित्य यांनी मेट्रो प्रशासनावर केली आहे. शिवसेनेची सत्ता असणाऱ्या महानगरपालिकेची या सर्व प्रकरणामध्ये काय भूमिका आहे या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य यांनी वृक्ष समिती हा एकमेव संबंध असल्याचे म्हटले आहे. ‘न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच तज्ञांची वृक्ष समितीवर नेमणूक करण्यात आली होती. या समितीमध्ये हे पाच तज्ञ आणि महापालिकेतील काही सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या सहा सदस्यांनी वृक्षतोड करण्याच्या विरोधात मतदान केले. इतकाच काय तो या समितीचा आणि महापालिकेचा संबंध,’ असं आदित्य म्हणाले.

मेट्रोमध्ये कारशेड बांधण्याचा सरकारने कायमच विरोध केला आहे असं आदित्य यांनी स्पष्ट केलं आहे. एकीकडे शिवसेना मेट्रो कारशेडला विरोध करत आहे तर दुसरीकडे शिवसेना सत्तेत आहे. ‘सरकारमध्ये असणाऱ्या शिवसेनेने या प्रकल्पाबद्दल काय केले?’ या प्रश्नाला आदित्य यांनी उत्तर दिले. ‘२०१७ साली महापालिकेत प्रस्तावासाठी आणण्यात आलेल्या २०३४ विकास आराखड्याला आम्ही विरोध केला. या प्रस्ताव सुधारित करुन पुन्हा मांडण्यात आल्यानंतरही आम्ही त्याला विरोध केला. त्यानंतर वृक्ष समितीच्या बैठकीतही आम्ही वृक्षतोड करण्याचा विरोध केला. आम्ही या वृक्षतोड करण्याच्या निर्णय़ाविरोधात लोकसभेत आणि विधानसभेत वेळोवेळी आमची भूमिका स्पष्ट केली. अनेकदा या निर्णयाविरोधात आंदोलने केले. आमच्या पक्षाच्या शितल म्हात्रे, शुभा राऊळ आणि प्रियंका चतुर्वेदीसारख्या महिला नेत्यांना आरेविरुद्ध आंदोलन केल्यामुळे ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे आरेसाठीच्या आंदोलनामध्ये आम्ही कुठेही पक्षाचे झेंडे घेऊन, टोप्या घालून उतरलो नाही. हे इतर पक्षांनी केले. आम्ही हा विषय अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला,’ असं आदित्य यांनी सांगितले. तसेच शिवसेनेचा विकासाला विरोध नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले आहे. ‘आम्हालाही मेट्रो हवी आहे. पण आरेतील कारशेडची जागा एक किलोमीटर अतिरिक्त वाढवण्यात आली आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट कऱण्यात आलेले नाही,’ असं आदित्य यांनी सांगितलं.

याचप्रमाणे आरे येथील कारशेडला पर्याय उपलब्ध असून प्रश्न केवळ झाडे तोडण्याचा नाही असं आदित्य यांनी सांगितलं आहे. ‘आरे येथील कारशेडला नक्कीच पर्याय उपलब्ध आहे. मेट्रो कारशेड संदर्भातील अभ्यास समितीने आरे हा शेवटचा पर्याय असून येथे कारशेड बांधल्यास पर्यावरणावर परिणाम होऊन मुंबईमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होईल असा अहवाल दिला होता. बॅक बे डोपो, ओशिवरा आणि कांजूरमार्ग येथे कारशेडसाठी जमीन उपलब्ध आहे. मेट्रो सहाची कारशेड कांजूरच्या जागेवरच होत आहे तेथे तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या तिप्पट झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. मात्र अशा वृक्षारोपणावर शंका असते कारण वृक्षारोपण केले किंवा वृक्ष स्थलांतरित केले तरी ते वृक्ष त्याच जोमाने उभी राहण्यास सात वर्षांचा कालावधी लागतो. तसेच प्रश्न हा केवळ झाडांचा नसून तो येथील जैवविविधतेचा आहे. जैवविविधता एकीकडून दुसरीकडे स्थलांतरित करता येत नाही. मी प्रस्ताव दिल्यानंतर आता महानगरपालिका ६६ ठिकाणी तीन लाख झाडे लावणार असून यामुळे मुंबईमध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राबवली जाणार आहे. पण आहे त्याची हानी करता कामा नये,’ असं आदित्य म्हणाले.