सोनिया सेठी (अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए )

मुंबई उपनगरी सेवेवरील ताण कमी करणारा मेट्रो प्रकल्प एमएमआरडीएतर्फे सुरू आहे. एकाच वेळी तब्बल १४ मार्गाचे काम सुरू असून सन २०२६ पर्यंत हे सर्व मार्ग पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. ३४० किमीचे मार्ग एकाच वेळी सुरू असलेले हे बहुतेक जगातील एकमेव उदाहरण आहे. दिल्लीचे मेट्रो मार्गदेखील टप्प्याटप्प्याने २० वर्षांत पूर्ण करण्यात आले होते.

रोज कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या लाखो नागरिकांचा प्रवास येत्या काही काळात सुखकर होणार आहे. पूर्वी केवळ ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरापर्यंत असलेले मुंबई महानगर क्षेत्र आता अलिबागपर्यंत विस्तारण्यात आले आहे. या संपूर्ण क्षेत्राला जोडणारे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. एकाच वेळी मेट्रोचे १४ मार्ग, नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा पारबंदर (ट्रान्स हार्बर) प्रकल्प, विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका असे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून, येत्या पाच-सहा वर्षांत मुंबई महानगर क्षेत्राचे वाहतूक व्यवस्थेचे चित्र बदलणार आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील लोकवस्ती वाढत असताना या परिसरासाठी एकात्मिक नियोजन करणे, जलद विकासासाठी नियोजन करणे, विकासकामांमध्ये समन्वय साधणे, त्यांवर देखरेख ठेवणे या उद्देशाने सन १९७५ मध्ये ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ची स्थापना झाली. पूर्वी केवळ ४३१२ चौ. किमीपर्यंत असलेल्या या क्षेत्राचा परीघ आता ६२७२ चौ. किमीपर्यंत विस्तारला आहे. या एवढय़ा मोठय़ा क्षेत्राचे नियोजन एमएमआरडीए करीत आहे. या विकासकामांमुळे प्रकल्पबाधित झालेल्या तब्बल ४४ हजार कुटुंबांना निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाची पर्यायी व्यवस्था देण्यात आली आहे.

मेट्रोचे १४ मार्ग सन २०२६ पर्यंत मुंबई उपनगरी सेवेवरील ताण कमी करणारा मेट्रो प्रकल्प एमएमआरडीएतर्फे सुरू आहे. एकाच वेळी तब्बल १४ मार्गाचे काम सुरू असून सन २०२६ पर्यंत हे सर्व मार्ग पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ३४० किमीचे मार्ग एकाच वेळी सुरू असलेले हे बहुतेक जगातील एकमेव उदाहरण आहे. दिल्लीचे मेट्रो मार्गदेखील टप्प्याटप्प्याने २० वर्षांत पूर्ण करण्यात आले होते. सध्या सुरू असलेला घाटकोपर-वर्सोवा मार्ग सुरू झाल्यामुळे हजारो मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचला आहे. या चौदा मार्गाच्या नियोजनाबरोबरच वेगाने काम होण्यावरही आम्ही भर दिला आहे. या १४ मार्गावर मिळून एकूण १५५ स्थानके आहेत. या स्थानकाचे ‘ऑपरेशन कंट्रोल सेंटर’ वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) स्थापन करण्यात येईल. त्याकरिता ‘मेट्रो भवन’ उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या परिचालनासाठी एका कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक मार्गावरील मेट्रोला ठरावीक रंगाची ओळख देऊन त्याचे ब्रॅण्डिंग केले जाणार आहे.

मेट्रोची स्थानके ही पुढील १०० वर्षे वापरली जातील या दृष्टिकोनातून त्यांचे आरेखन करण्यात येणार आहे. दिसायला दिमाखदार असण्याबरोबरच या स्थानकात तंत्रज्ञान, सुरक्षा व्यवस्था, प्रवाशांसाठी सुविधा यांवर भर दिला जाणार आहे. स्थानकात उतरल्यापासून ते ईप्सित स्थळी जाईपर्यंत प्रवाशांना संपूर्ण सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण योजनेंतर्गत प्रत्येक स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. प्रत्येक स्थानकाच्या बाहेर चांगले रस्ते, पार्किंग, पदपथ, रस्त्यावरचे दिवे, सायकल ट्रॅक, पिक-अप पॉइंट्स, सीसीटीव्ही अशा सुविधा गरजेनुसार पुरवण्यात येतील.

एमएमआरडीएतर्फे आगामी काळात मेट्रोव्यतिरिक्त अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यात मुंबई पारबंदर प्रकल्प आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प हे दोन मोठे प्रकल्प आहेत. पारबंदर प्रकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा २२ किमीचा थेट मार्ग उभारण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईचा, रायगड जिल्ह्य़ाचा विकास होण्यास मदत होणार आहे, तर विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक प्रकल्प १२६ किमीचा असून १२ हजार कोटींचा आहे.

याबरोबरच वांद्रे-कुर्ला संकुल ते पूर्व द्रुतगती मार्ग यांच्या दरम्यान उन्नतमार्ग बांधण्यात येणार आहे. याअंतर्गत बीकेसी ते चुनाभट्टी दरम्यान १.६ किमीची जोडणी करण्यात येणार असून त्यामुळे अंतर ३ किलोमीटरने कमी होईल. १५६ कोटींच्या या प्रकल्पामुळे शीव, धारावी येथील वाहतूक कोंडी कमी होईल. वेळ व इंधन बचत होईल, तसेच प्रदूषणही कमी होईल. तसेच बीकेसी जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सागरी सेतू ते बीकेसी अशा दोन मार्गिका आणि रस्ते बांधण्यात येणार आहेत. बीकेसी ते सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता जंक्शनवरील वाहतूक सुधारण्यासाठी दोन उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहेत.

या सगळ्या शहर भागांतील प्रकल्पांबरोबरच मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी बाह्य़ क्षेत्र रस्ते विकास योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर भिवंडी-कल्याण रोडवर उड्डाणपूल, ऐरोली-काटई नाका प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन येथे वाहतूक सुधारणा प्रकल्प राबवणे, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावर मिठी नदी ते वाकोला पुलाला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे असे विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. हे सगळे प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून येत्या काळात त्यामुळे वाहतुकीचे चित्र निश्चितच पालटणार आहे.

शब्दांकन : इंद्रायणी नार्वेकर