टाळेबंदीच्या काळातील वेतनाचा भार प्राधिकरण उचलणार

मुंबई : करोनाची भीती आणि हाताला काम नसल्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी कामगारांचे मूळ गावी स्थलांतर होत असले तरी, मुंबई शहर आणि परिसरात सुरु असणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवरील सुमारे ११ हजार मजुरांची सर्व व्यवस्था मुंबईतच करण्यात आली आहे.

करोनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शहर आणि महानगर परिसरातील पायाभूत सुविधांची कामेदेखील मागील आठवडय़ात ठप्प झाली. सध्या एमएमआरडीएतर्फे सर्वाधिक प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत. सहा मेट्रो मार्गिका, मुंबई पारबंदर प्रकल्प आणि इतर उड्डाणपूल या कामांचा त्यामध्ये समावेश आहे.

शहर आणि परिसरात सुरू असणाऱ्या सहा मेट्रो मार्गिका प्रकल्पांवर सुमारे पाच हजार, शिवडी ते चिर्ले – मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पाच्या तीन पॅकेजमध्ये पाच हजार, छेडा नगर येथील उड्डाणपूल विस्तार, कलानगर ते वांद्रे वर्सोवा सी-लिंक विस्तार उड्डाणपूल सुमारे एक हजार असे एकत्रित सुमारे ११ हजार मजूर कार्यरत आहेत. हे सर्व कामगार मुंबई बाहेरील असून या कामगारांसाठी प्रकल्पस्थळापासून जवळच निवासाची व्यवस्था पूर्वीपासूनच आहे. संपूर्ण टाळेबंदीच्या काळात याच ठिकाणी या कामगारांसाठी इतर सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहर आणि परिसरात विविध ठिकाणी प्रकल्पानुसार या कामगारांच्या छावण्या विखुरल्या असून, त्याच ठिकाणी कंत्राटदारांमार्फत त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या काळात त्यांची आरोग्य तपासणीदेखील नियमितपणे सुरु असून, आरोग्य सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कामगारांपैकी कोणीही आजारी नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान टाळेबंदीच्या काळातील वेतनाचा भार प्राधिकरणामार्फत उचलला जाईल असे ते म्हणाले.

टाळेबंदीमुळे एमएमआरडीएच्या सुरु असलेल्या प्रकल्पांच्या आर्थिक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टाळेबंदीच्या काळाइतका वेळ प्रकल्पपूर्ती लांबणीवर जाईल असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राज्यात समृद्धी महामार्गाचे काम १६ पॅकेजमध्ये सध्या सुरु असून या ठिकाणी सुमारे १७ हजार पाचशे कामगार कार्यरत आहेत. टाळेबंदीनंतर काही कामगारांनी त्यांच्या छावण्या सोडल्या असल्या तरी सध्या कामगारांची सर्व सोय प्रकल्पस्थळाजवळील छावणीतच केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मेट्रो प्रकल्पावर कार्यरत असणारे सुमारे नऊ हजार ७५० कामगार सध्या ५१मजूर छावण्यांमध्ये आहेत. या कामगारांच्या प्राथमिक गरजा, निवास आणि अन्न व्यवस्थेची काळजी कं त्राटारांमार्फ त घेतली जात असल्याचे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वांना मास्क आणि ग्लोव्हजचा पुरवठा करण्यात आला आहे, तसेच त्यांच्या जागेचे र्निजतुकीकरण नियमितपणे केले जात असल्याचे महामंडळाने सांगितले.

एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन, सुमारे साडे सतरा लाख रुपये मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राधिकरणाकडे सध्या सुमारे ६५० कर्मचारी कार्यरत आहेत.