नगरसेवक निधीवरून मनसे आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच सत्ताधाऱ्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने मात्र दोघांनाही शहाणपणाचा सल्ला दिला आहे. दोन्ही बाजूंनी परिपक्वता दाखवणे गरजेचे होते, असे सांगत भाजप गटनेत्यांनी गेले चार दिवस पाळलेले मौन मंगळवारी सोडले.
कंत्राटदारांच्या सांगण्यावरून महापौरांनी नगरसेवकांना निधीवाटप केल्याचा आरोप मनसेकडून झाल्यानंतर महापौरांनीही मनसेच्या गटनेत्याविरोधात आझाद मैदानात तक्रार केली. त्यामुळे मंगळवारी सकाळी स्वत:च्या तक्रारीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक खाते व नंतर महापौर स्नेहल आंबेकर यांनी केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी हजेरी लावली. काही तास झालेल्या प्रश्नोत्तरानंतर महापालिका सभागृहात पोहोचलेल्या मनसेच्या गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांच्या राजीनाम्याची मागणीही केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. तोपर्यंत महापौर संशयाच्या धुक्यात आहेत. महापौरपद हे नागरिकांसाठी, शहरासाठी सन्मानाचे पद असल्याने महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली.
मनसेच्या मदतीला धावून आलेले काँग्रेसचे नगरसेवक व एकाकी पडलेल्या शिवसेना नगरसेवकांनी धरलेली मिठाची गुळणी यात भाजपने चार दिवस तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र मंगळवारी भाजप गटनेते मनोज कोटक यांनी दोन्ही पक्षांना शहाणपणाचा सल्ला दिला. महापौर व मनसे गटनेते यामधील प्रसारित झालेल्या संभाषणाच्या खरेखोटेपणाची शहानिशा करणे आवश्यक आहे. उच्चपदस्थ व्यक्तीने दूरध्वनीवरून अशा भाषेत बोलू नये व उच्चपदस्थांचे अंतर्गत वर्तुळातील संभाषण अशा पद्धतीने प्रसारित केले जाऊ नये, असा सल्ला कोटक यांनी दिला. दिल्ली व नंतर राज्यातील सत्ताबदलानंतर सतत सेनेवर कुरघोडी करत असलेल्या भाजपच्या गटनेत्यांनी कोणाचीही बाजू न घेता दिलेल्या कानपिचक्या पालिका वर्तुळात चर्चेचा विषय झाल्या होत्या.
मनसेच्या गटनेत्यांनी मात्र हा सल्ला धुडकावला. सत्तेत राहूनही मित्रपक्षाच्या विरोधात सतत कारवाया करत असलेल्या भाजपच्या गटनेत्यांनी मनसेला नैतिकता शिकवू नये, असेही देशपांडे म्हणाले. दरम्यान, मनसेचे चेतन कदम व संतोष धुरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारदारांना यासंबंधी चौकशीसाठी आज, बुधवारी बोलावण्यात आले आहे. पालिकेत मनसे, काँग्रेस, भाजप या तिन्ही पक्षांकडून नगरसेवक निधीबाबत मतप्रदर्शन केले जात असले तरी शिवसेनेच्या एकाही वरिष्ठ नगरसेवकाने याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.