शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. बाळासाहेबांच्या जयंती दिनीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षामध्ये नवी उमेद पेरण्याचा प्रयन्त करणार आहेत. त्याचे संकेत मनसेने बाळासाहेबांना वाहिलेल्या आदरांजलीतून दिले आहेत. मनसेच्या अधिकृत खात्यावरून बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे या तीन पिढ्यांचा फोटो ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आहे. ‘विचारांचा आणि कृतीचा वारसा इतका उत्तुंग आणि यथायोग्य आहे की वर्तमान आणि भविष्याला संघर्षाचं ओझं कधीच वाटू शकत नाही!,’ अशा शब्दात मनसेनं शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केलं आहे.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साजरी होत असताना गोरेगाव येथील नेस्को मैदानातील सभागृहात मनसेचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात नव्या झेंड्याचं अनावरण राज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं. अधिवेशनाच्या ठिकाणी सभागृहात भव्य स्टेज उभारण्यात आला असून स्टेजवर महापुरुषांच्या फोटोंमध्ये प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांचाही यामध्ये समावेश आहे.

मोदी म्हणाले धैर्यवान आणि..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली. नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहताना बाळासाहेब ठाकरे अद्यापही लाखो लोकांना प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली. धैर्यवान आणि अदम्य….लोकांच्या हितासाठी एखादा मुद्दा उपस्थित करताना कधीही त्यांनी संकोच केला नाही. त्यांना नेहमी आपल्या भारतीय निती आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते अद्यापही लाखो जणांना प्रेरणा देत आहेत”.