कोहिनुर मिलप्रकरणी राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. 22 ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना मिळालेल्या नोटिसीनंतर विरोधी पक्षांनी राज ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत उद्याच्या चौकशीतून काही निघेल असं वाटत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

अनेक पक्षांनी राज यांना पाठिंबा दिल्यानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) चौकशीतून काही निघेल असं वाटत नसल्याचं सांगत राज यांची पाठराखण केली आहे. यापूर्वी भाजपा सरकार सूडबुद्धीने या कारवाया करत असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून करण्यात आला होता. तसंच राज यांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर मनसेकडून ठाणे बंदची हाक देण्यात आली होती. परंतु राज ठाकरे यांनी लोकांना त्रास होईल, असं काहीही करू नये, असे आदेश मनसैनिकांना दिले. त्यानंतर ही बंदची हाक मागे घेण्यात आली होती.

कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस बजावण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. नोटीस बजावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला असून सरकारविरोधी भूमिका घेतल्याने सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मनसे अशा नोटिसीला भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.