बोरिवलीतील शांतिवन परिसरातील विकासकामामध्ये ढवळाढवळ केल्याप्रकरणी स्वपक्षातील माथाडी कामगारांनी मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांना त्यांच्याच कार्यालयात बुधवारी बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याचे मात्र दोन्ही गटांनी टाळले.
शांतिवन परिसरात विकासकाम सुरू आहे. येथील विशिष्ट कामाच्या ठिकाणी शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे कार्यकर्ते असलेली माथाडी कामगार संघटना आहे. दरेकर यांनी या कामाच्या ठिकाणी ‘अर्थपूर्ण’ हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. मात्र, बोरिवलीतील मनसेच्याच अन्य एका नगरसेवकाचे वर्चस्व असलेल्या माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दरेकर यांच्या या कृत्याला आक्षेप घेतला. त्यानंतर दरेकरांनी या माथाडी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी उभय गटांत जोरदार वाद झाला.
संतापाच्या भरात दरेकर यांनी माथाडींच्या दिशेने एसीचा रिमोट फेकून मारला. त्यामुळे चिडलेल्या माथाडी कामगारांनीही मग दरेकर यांना बेदम मारहाण केली, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

माथाडी कामगार संघटनेच्या या कार्यकर्त्यांना आपण बोलावले नव्हते. ते स्वत: माझ्या दहिसर येथील कार्यालयात आले होते. हे कार्यकर्ते कंत्राटदारांना दमदाटी करून कामे बंद पाडत आहेत. त्यांच्याशी थोडी बाचाबाची आणि झटापट झाली.                 – प्रकाश दरेकर, मनसे नगरसेवक