स्थानिक परिसराचा विकास करण्यासाठी देण्यात येणारा निधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणासाठी दिला आहे. यामध्ये रोषणाई, लाइट बिलबोर्ड्स, पथदिवे, पुतळ्यांवरील स्पॉट लाइट्स, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील रोषणाई आणि इतर रोषणाईची काम केली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. 

शिवाजी पार्क परिसरामधील स्थानिक राजकारणासंदर्भात बोलायचं झाल्यास या भागामधील शिवसेनेचा प्रभाव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर तुलनेने कमी झालाय. मात्र शिवसेनेने आता या भागामध्ये पुन्हा आपला प्रभाव निर्माण केला असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असतानाच मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिलाय हे सुद्धा विशेष आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प चोरला आहे. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?”

शिवाजी पार्कचा होणार कायापालट

आमदारांच्या या विकास निधीमधून प्रत्येक आमदाराला त्याच्या स्थानिक परिसरामधील कामांसाठी चार कोटींचा निधी दरवर्षी दिला जातो. १९ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक आणि खेळाडू शिवाजीपार्कच्या परिसरातील फुटपाथचा वापर करतात. मात्र या ठिकाणी फुटपाथ योग्य स्थितीमध्ये नसून त्यामुळे स्थानिकांना अडचणींचा समाना करावा लागतोय. त्यामुळेच मी माझ्या आमदार निधीमधून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि शुशोभीकरणासाठी देत आहे, असं म्हटलं होतं. सामान्यपणे एखाद्या कामासाठी आमदार २५ लाखांपर्यंतचा निधी देऊ शकतो. मात्र या प्रकरणामध्ये विशेष सवलतीअंतर्गत १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे समजते.