आपण अनेकदा टॅक्सीने प्रवास करत असतो. जेवढं मीटर होतं तेवढं बिल आपण चालकाच्या हातात देतो आणि निघून जातो. परंतु कधी जास्त बिल झालं तर फारसे काही प्रश्न न विचारता आपण निघून जातो. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे जुन्या मीटरच्या टॅक्सी आणि रिक्षा होत्या. परंतु काही वर्षांपासून डिजिटल मीटर असलेल्या टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर चालू लागल्या आहेत. जस तंत्रज्ञान वाढतंय तसं त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढत चालल्याचं अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. अनेकदा मीटर फास्ट असण्यासारखे प्रकारही घडत असतात.

पण नुकताच मनसे नेते नितीन नांदगावकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. टॅक्सी चालक आपली कशी फसवणूक करतात याचा खुलासा केला आहे. अनेकदा टॅक्सीच्या मीटरना बटन असलेलं आपल्याला पहायला मिळतं परंतु बटन असलेल्या मीटरमध्ये हे टॅक्सीचालक आपली कशी फसवणूक करतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

मुंबईतील ८० टक्के टॅक्सींमध्ये मीटर फास्ट करण्याची बटणं आणि पोलिसांच्या मदतीने रोज हजारो प्रवाशांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा नितीन नांदगावकर हे व्हिडीओमध्ये करत आहेत. दादर, भायखळा, कुर्ला, चर्चगेट, बांद्रा, मुंबई एअरपोर्ट अशा अनेक ठिकाणी हे प्रकार सर्रास सुरू आहेत. आम्हाला मुंबई वाहतूक पोलिसांकडून ही अपेक्षा नव्हती. यापुढे बटनवाली टॅक्सी दिसली तर फोडली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. जर असे प्रकार बंद झाले नाही तर यापुढे या टॅक्सी भंगारात दिसतील. तसंच जनतेनंही मीटरवर लक्ष ठेवावं असं आवाहन नांदगावकर यांनी केलं आहे.