मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेत बारा वर्षे फुकट गेली, अशी टीका करत शिशिर शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. मनसेतून गेल्या काही वर्षांत एकापाठोपाठ एक राज यांचे निष्ठावंत शिलेदार मनसेला सोडून जात असून मनसेच्या ‘इंजिन’कडून याबाबत नाराजीची साधी ‘शिट्टी’ही वाजविण्यात आलेली नाही, याबाबत मनसैनिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक हे राज ठाकरे यांचे बालेकिल्ले आहेत. या बालेकिल्ल्यांमधूनच राज यांनी आपल्या ज्या शिलेदारांना लोकसभा व विधानसभेची उमेदवारी दिली, त्या अनेक विश्वासू साथीदारांनी राज यांच्या कारभारावर टीका करत मनसेला ‘जय महाराष्ट्र’केला. केवळ विधानसभा व लोकसभेतीलच उमेदवारांनी मनसेला रामराम ठोकला नाही तर मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक महापालिकेतील नगरसेवकांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली.

नाशिकवर राज ठाकरे यांचा विशेष जीव असतानाही हेमंत गोडसे यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला. त्यापाठोपाठ मनसेचे आमदार असलेले वसंत गीते यांच्यासह नाशिकमधील अनेक राजसमर्थकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. वसंत गीते यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना नाशिक महापालिकेचे उपमहापौरपदही मिळाले. मनसेतून भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविलेल्या श्वेता परुळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेतील सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांना पक्षव्रवेश देऊन शिवसेनेने मनसेला मोठे खिंडार पाडले. मनसेचे विरोधी पक्षनेते दिलीप लांडे यांच्यासह सहा नगरसेवक फुटले होते. दिलीप लांडे यांना शिवसेनेने सुधार समितीचे अध्यक्षपद दिले आहे. याशिवाय नाशिकचे माजी महापौर यतीन वाघ, संजय घाडी, शिल्पा सरपोतदार, चेतन कदम तसेच कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह अनेकांनी शिवसेनेचे शिवबंधन बांधले. याशिवाय मनसेच्या दादरमधील विभाग अध्यक्ष प्रकाश पाटणकर यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे येथेही दोन माजी शहर अध्यक्षांनी मनसेला रामराम ठोकला होता. त्यापैकी एकाने पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर, राम कदम व मंगेश सांगळे या मुंबईतील तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यापैकी प्रवीण दरेकर व राम कदम हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य

शिशिर शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत एवढाच प्रश्न शिल्लक होता. मात्र मनसेत आपली बारा वर्षे फुकट गेल्याची टीका केल्यानंतरही मनसेचे ‘राज’कारण जराही ढवळून निघाले नाही, याबद्दल मनसैनिकांमध्येच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.