संदीप आचार्य 
मुंबईत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना एकीकडे रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळण्यात अडचणी येत आहेत तर दुसरीकडे रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळणे दुरापास्त झाले आहे. रुग्णवाहिकांची ही अडचण लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने’ मुंबईतील प्रत्येक वॉर्डात १२ मोफत टॅक्सी रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला सादर केला आहे. यासाठी टॅक्सीत आवश्यक त्या सुधारणा करून रुग्णांना मोफत सेवा देण्याची तयारी मनसेने दाखवली आहे.

एकीकडे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे महापालिका १०८ क्रमांकाच्या माध्यमातून चालवत असलेल्या रुग्णवाहिकांमधील ३२ चालकांना करोनाची लागण झाली आहे. बेस्टच्या काही बसेसचे रुग्णवाहिकेत रुपांतर करण्यात आले असून आता उबर टॅक्सीच्या माध्यमातून सुमारे ४५० रुग्णवाहिका मुंबईत चालविण्याचा प्रयत्न आहे. तथापि या रुग्णवाहिका वेळेत मिळणे हे दिव्य असल्याचा रुग्णांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने लक्षण असलेल्या तसेच ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांसाठी वीस हजार खाटा असलेली तात्पुरती रुग्णालये मुंबईत उभारण्याचा सपाटा लावला आहे. यातून बी के सी, महालक्ष्मी, वरळी, गोरेगाव, मुलुंड ते दहिसरपर्यंत ही तात्पुरती रुग्णालये उभारण्याचे काम सुरु आहे. याशिवाय जूनपर्यंत एक लाख क्वारंटाईन सेंटर व जूनच्या मध्यावधी पर्यंत दीड लाख लोकांची क्वारंटाइन केंद्रात व्यवस्था केली जाणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले.

“तथापि या लक्षण नसलेल्या तसेच स्वत: हून रुग्णालयात जाऊ शकणाऱ्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात अथवा क्वारंटाइन केंद्रात पोहोचवण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची गरज लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने नेमकी ही अडचण ओळखून त्यांच्या संघटनेतील टॅक्सी व रिक्षा चालकांची बैठक घेऊन टॅक्सी-रिक्षा रुग्णवाहिकांची संकल्पना मांडली” असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. “आमच्या संघटनेतील जवळपास हजाराहून अधिक रिक्षा टॅक्सी चालकांनी या संकल्पनेला मान्यता दिल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव आम्ही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना भेटून दिला. यानंतर सुरेश काकाणी यांनी टॅक्सीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील असे सुचवले त्यानुसार आम्ही बदल करण्याची तयारीही केली आहे. आम्ही प्रत्येक विभागासाठी १२ टॅक्सी व रिक्षा तयार ठेवल्या आहेत. या रुग्णांना मोफत रुग्णालय वा क्वारंटाईन केंद्रात रुग्णांना पोहोचवतील” असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

महापालिका नियंत्रण कक्षमधून पालिकेच्या विभाग कार्यालयाला रुग्णवाहिकेसाठी कळवले जाईल व जेथे रुग्ण असेल तेथून संबंधित विभाग कार्यालयातून टॅक्सी चालकाला मोबाईलवर संदेश जाऊन तो रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाईल, असे संदीप देशपांडे म्हणाले. ही सर्व सेवा मोफत असून सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत ही टॅक्सीरुग्णवाहीका चालवली जाणार आहे. या सर्व टॅक्सींचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी पालिका घेईल असे सुरेश काकाणी यांनी सांगितले. अजून मनसेच्या या प्रस्तावाला पालिकेने मान्यता दिलेली नसली तरी लवकरच ती मिळेल व करोना असलेल्या व नसलेल्या सर्व रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल होता येईल असे संदीप देशपांडे म्हणाले. या योजनेच्या नियोजनात मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांची महत्वाची भूमिका आहे.