मोबाइल तिकीटप्रणालीला अत्यल्प प्रतिसाद

पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी कागदविरहित सुरू करण्यात आलेल्या मोबाइल तिकीटप्रणालीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने त्याला पर्याय म्हणून आता छापील तिकिटांचा आधार घेण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. आहे. त्यानुसार सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीमने (क्रिस) याच तिकीटप्रणालीवर तिकीट काढून त्याची छापील प्रत एटीव्हीएम यंत्राद्वारे काढता येईल, अशी सोय करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

पर्यावरणस्नेही रेल्वेचा नारा देणाऱ्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कागदविरहित मोबाइल तिकीटप्रणाली सुरू केली होती. तिकीट खिडक्यांसमोरील गर्दी कमी करून प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या सोयीने तिकीट काढण्याचा पर्याय हा उद्देश ठेवून ही प्रणाली सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षभरात या प्रणालील खूपच कमी प्रतिसाद मिळाला. दर दिवशी फक्त १००० ते १५०० लोक या प्रणालीचा वापर करीत असल्याचे आढळले आहे.

त्यातच या प्रणालीत जीपीएस यंत्रणा वापरताना समस्या येत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली आहे. त्यामुळे जीपीएस यंत्रणा न वापरता मोबाइलवर तिकीट काढता येईल, असा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार ‘क्रिस’ने केला आहे. त्यानुसार तिकिटाची छापील प्रत एटीव्हीएम यंत्रावरून घेण्याची सोय करण्यात आली आहे.

या प्रणालीद्वारे तिकीट काढताना प्रवासी रेल्वे स्थानकात असला, तरी तिकीट निघेल. त्यानंतर या प्रणालीद्वारे प्राप्त झालेला सांकेतिक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक एटीव्हीएम यंत्रावर टाकल्यानंतर या यंत्राद्वारे त्याची छापील प्रत घेता येणार आहे. सध्या या प्रणालीची चाचणी सुरू असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही सेवा प्रवाशांच्या सेवेत येईल, असे ‘क्रिस’चे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केले.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांची तिकिटेही मोबाइलवर उपनगरीय तिकीटप्रणालीव्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटासाठीही ‘क्रिस’ मोबाइल तिकीटप्रणाली विकसित करीत आहे. त्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडीचे तिकीट काढल्यानंतर एक वेळ वापरता येणारा सांकेतिक क्रमांक मोबाइलवर पाठवला जाईल. हा क्रमांक एटीव्हीएममध्ये टाकून हे तिकीट छापून घेता येणार आहे. या प्रणालीचे अ‍ॅप किंवा लिंक विकसित करण्याची प्रक्रिया ‘क्रिस’तर्फे सुरू करण्यात आली आहे.