गेल्या दोन वर्षांत एकही तक्रार नाही

मुंबईत बसविण्यात आलेल्या मोबाइल मनोऱ्यांमधून होणारा लहरींचा उत्सर्ग हा दूरसंचार विभागाने घालून दिलेल्या प्रमाणापेक्षा खूप कमी असल्याचे नुकत्याच केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत समोर आले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांत मुंबईतील मोबाइल मनोऱ्यांमधून अधिक किरणोत्सर्ग होत असल्याची एकही तक्रारी आली नसल्याचेही दूरसंचार विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल मनोऱ्यांमधून होणारे किरणोत्सर्ग आरोग्यास हानिकारक असल्याची भीती बाळगत अनेक रहिवासी ठिकाणांवरील मोबाइल मनोरे बंद करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईत मोबाइल नेटवर्कची समस्या जाणवते, असे दूरसंचार खात्याच्या पश्चिम विभागाचे टेलिकॉम एन्फोर्समेंट रिसोर्स मॉनिटरिंगचे उपमहाव्यवस्थापक एम. एम. गुप्ता यांनी स्पष्ट केले. मुंबईसारख्या शहरात मोबाइलची चांगली जोडणी असणे गरजेचे आहे. पण सध्या लोकांच्या मनामध्ये या मनोऱ्यांमधून येणारा किरणोत्सर्ग हानिकारक असल्याची भीती आहे. मात्र त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले. यातच मनोऱ्यांमधून किती किरणोत्सर्ग करायचा याचे प्रमाणही दूरसंचार विभागाने ठरवून दिले आहे. या प्रमाणानुसार किरणोत्सर्ग होतो की नाही यासाठी मुंबईत तीन ठिकाणी दूरसंचार तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. त्या वेळेस नोंदविण्यात आलेला किरणोत्सर्ग हा प्रमाणापेक्षाही खूप कमी प्रमाणात होत असल्याचे समोर आले. यामुळे ते आरोग्यास हानिकारक नसल्याचे सिद्ध होत असल्याचेही गुप्ता म्हणाले.