किनारपट्टीवरील जिल्ह्य़ांमध्ये अतिदक्षता

राज्यात विशेषत: कोकण किनापट्टीवर उद्या ७ जून ते सोमवार ११ जून या कालावधीत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्य़ांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ांत बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ांत बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची व अतिवृष्टीची शक्यता असून रायगड जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शनिवार रविवारी कोकणातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये मुंबई व नजीकच्या परिसरांसह बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा अंदाज आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानंतर, राज्य आपत्ती निवारण कक्षाने राज्यातील बहुतेक ठिकाणी विशेषत: कोकण परिसरात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. राज्यात पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन राज्यातील विशेषत: कोकण भागातील जिल्हा प्रशासनास सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवून अशा परिस्थितीत योग्य ती दक्षता घेण्याच्या  सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनो दक्षता घ्या..

मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या, अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रवास टाळा.पावसात विजा चमकताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर राहावे. आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी सर्व जिल्ह्य़ांमध्ये १०७७ या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा. मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा.

शनिवार-रविवारची सुटी रद्द

कुलाबा वेधशाळेकडून ९ ते ११ जून दरम्यान उत्तर कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित खातेप्रमुखांच्या सुटया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना आपल्या विभागात उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मोसमी पावसाचा आज राज्यात प्रवेश

  • पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाचा ६ जूनलाच राज्यात प्रवेश अपेक्षित असताना तो राज्याच्या वेशीजवळ येऊन थबकला आहे.
  • गुरुवारी (७ जून) त्याचा तळकोकणातून राज्यात प्रवेश होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.