हवामान खात्याच्या वर्षांभाकितांवर पाणी; आता वायदा सोमवारनंतरचा

देशात यंदाचा पाऊस नेहमीच्या तुलनेत अंमळ लवकरच दाखल होईल, या हवामान खात्याने वर्तविलेल्या भाकितावर सपशेल पाणी पडले असून, नेहमीच्या तुलनेत तो उशिरानेच पाऊल टाकेल, हे आता स्पष्ट होत आहे. मोसमी पावसाच्या आगमनासाठी जाहीर केलेले किमान चार दिवस जवळपास कोरडे गेले असून, आता येत्या सोमवारनंतर मोसमी वारे पुन्हा एकदा प्रभावी होतील, असा होरा व्यक्त करण्यात आला आहे.

भारतीय शेती आणि भारताचे अर्थकारण अजूनही बहुतांशी मोसमी पावसावर अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या तापाने त्रस्त झालेल्या प्रत्येकालाच पावसाची आस लागलेली असते. त्यामुळे हवामान खात्याकडून वर्तविल्या जाणाऱ्या पावसाच्या अंदाजाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. यंदा, सुरुवातीला ७ जून ही तारीख मोसमी पावसाच्या आगमनासाठी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर ११, १५ व १७ अशा तारखा हवामान खात्याने त्यासाठी जाहीर केल्या. यातील प्रत्येक दिवस मुसळधार पावसाची आस लावून आला तसाच निघून गेला. देशात अनेक ठिकाणी ‘अंदाजाचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही’, अशी नागरिकांची स्थिती होती.

केरळमध्ये मोसमी पाऊस साधारण १ जूनला दाखल होतो व ७-८ जूनच्या सुमारास तो कोकणात येतो. पुढे मुंबई व राज्य तो व्यापतो. यावेळी मात्र सारे अंदाज फोल ठरवीत तो अद्याप वाकुल्याच दाखवीत आहे. वळिवाच्या पावसाने मात्र राज्यात चांगलाच जोर धरला आहे. त्याचाच फायदा घेत हवामान खात्याने राज्यात काही ठिकाणी पावसाचे आगमन जाहीर करून टाकले. वास्तविक हवामान खात्याच्या नकाशावर आणि मुंबईच्या रडारवरही कुठेही मोसमी पावसाच्या वाऱ्याची दिशा प्रतिबिंबीत नव्हती. येत्या १९ जूननंतर मोसमी वारे या नकाशांमध्ये जोरकसपणे प्रतिबिंबित झाल्याचे तूर्त दिसत आहे.

दरम्यान, मुंबई, नाशिक, परभणीपर्यंत १२ जून रोजी मोसमी वारे पोहोचल्याचे केंद्रीय वेधशाळेने जाहीर केले. ८० टक्के हवामान केंद्रांवर सलग दोन दिवस अडीच मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस, वाऱ्यांची दिशा व ढगांच्या आवरणाची जाडी या निकषांवर मोसमी वाऱ्यांचे आगमन निश्चित केले जाते. तांत्रिक निकषांनुसार मोसमी वारे आले असले तरी प्रत्यक्षात मोसमी वाऱ्यांचे वैशिष्टय़ असलेला संततधार पाऊस मात्र मुंबईसह कोकणपट्टीत सुरू झालेला नाही. रविवारची मध्यरात्र वगळता गेल्या आठवडय़ाभरात मुंबईत पावसाच्या फारशा सरी पडलेल्या नाहीत. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कुलाबा येथे १.२ मिमी तर सांताक्रूझ येथे १९ मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित कोकणातही पावसाच्या काही सरी आल्या. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद कल्याण येथे ८५ मिमी झाली. पावसाचा हा दुरावा आणखी तीन ते चार दिवस राहील, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. १८ जूनपासून उत्तर कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथे तर १९ जूनपासून दक्षिण कोकणात मोसमी वारे प्रभावी होणार आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ाचा उर्वरित भाग, विदर्भात काही भाग यासह गुजरात, छत्तीसगढ, ओडिसा तसेच पश्चिम बंगालमध्ये तीन ते चार दिवसांनंतर मोसमी वारे पोहोचतील असा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

घोळ कशामुळे?

हवामान खात्याच्या प्रारूपामध्ये एकवेळ पाऊस किती पडणार, पडणार की नाही हे चित्र बदलेल, पण वाऱ्यांची दिशा आणि तापमानाबद्दलची प्रारूपे स्थिर असतात. यावेळी मोसमी वारे योग्यरीत्या न तपासता केलेल्या अंदाजाने घोळ झाला आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. हवामान खाते मात्र, सर्व उपविभागांकडील माहिती घेऊनच मोसमी पावसाची घोषणा केल्याचे सांगत आहे.

दोन पावसांतील फरक

मोसमी वारे पश्चिमेकडून किंवा दक्षिण-पश्चिमेकडून येतात. या पावसाचे ढग मध्यम उंचीवर आणि दूरवर पसरलेले असतात. हा पाऊस गडगडाट न करता सातत्य राखून संथपणे बरसतो. तर ढगांच्या गडगडाटासह, विजांच्या कडकडाटासह आणि कमी वेळेत अधिक पडणारा पाऊस ही वळिवाच्या पावसाची खूण आहे.

पर्जन्यभान

१ ते १४ जूनदरम्यान राज्यात अध्र्याहून अधिक जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.  या वेळी कोकणपट्टीपेक्षा मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात पावसाने जोरदार मुसंडी मारली. ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर व भंडारा येथे मात्र सरासरीपेक्षा २० ते ४० टक्के कमी पाऊस आहे.