मुंबईतील कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात केडीएएचद्वारा १ हजारपेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रिया करण्याचा अग्रणी बहुमान मिळविणारे, केडीएएच हे पश्चिम भारतात अशा प्रकारचे यश मिळविणारे पहिले रुग्णालय आहे.
हे तंत्रज्ञान खुली शस्त्रक्रिया आणि लॅपरोस्कोपी अशा दोन्हींसाठी अतिशय परिणामकारक आणि कार्यक्षम पर्याय आहे. दा विन्सी या शस्त्रक्रिया पद्धतीचा वापर करीत शस्त्रक्रियेच्या किचकट पद्धतीसाठी किमान छेद देणारा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात. यामध्ये तयार करण्यात आलेला सर्जनचा कंसोल, चार संवादात्मक रोबोटिक आम्र्ससह रुग्णाची कार्ट, उच्च कामगिरी करणारी ३ डी व्हिडन पद्धत आणि एन्डोरिस्ट उपकरणाचा समावेश आहे. यामध्ये रुग्णांना फार काळ रुग्णालयात राहावे लागत नाही, तर कमी वेदना, संसर्गाची कमी जोखीम, कमी रक्त जाणे, कमी ट्रान्सफ्युजन्स, कमी ओरखडे यामुळे ही पद्धत रुग्णांच्या पसंतीस पडत आहे.
या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोकिलाबेन रुग्णालय येथील शस्त्रक्रिया आणि युरो-ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. टी.बी. युवराज यांनी ६३३ पेक्षा अधिक मूत्रमार्गाच्या कर्करोगांच्या रुग्णांवर उपचार केला आहे. यामध्ये मूत्रपिंडाचा कर्करोग, मूत्राशय आणि शिश्न, वृषणांचा कर्करोग यांचा समावेश आहे. त्याबरोबरच गर्भाशयाचा कर्करोग आणि इतर स्त्री रोगविषयक कर्करोगांसंबंधित स्थिती ग्रेड ४चा एन्डोमेट्रिओसिस, हिस्टेरेक्टोमी अशा रुग्णांसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.