20 January 2019

News Flash

भायखळा रुग्णालयात मृत्यूदर अधिक

रेल्वेच्या भायखळा रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या आणि साधने मुळे रुग्णालयात मृत्यूदर अधिक

भायखळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयात

रेल्वे मंडळ अध्यक्षांसमोर कामगार संघटनांनी समस्यांचा पाढा वाचला

रेल्वे मंडळ अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आलेल्या अश्विनी लोहाणी यांच्यासमोर मोटरमन आणि रेल्वे कामगार संघटनांनी समस्यांचा पाढा वाचला. या वेळी मध्य रेल्वेच्या भायखळातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयात मृत्यूदर अधिक असून प्रत्येक वर्षी सरासरी २०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती संघटनांनी रेल्वे मंडळ अध्यक्षांना दिली. अपुऱ्या सोयिसुविधांभावी रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्यानेच मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची खंत संघटनांनी व्यक्त केली. रेल्वे कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी रुग्णालय आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असल्याचे सांगत यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन लोहाणी यांनी दिले.

लोहाणी यांनी शुक्रवारी सीएसएमटी स्थानकाची पाहणी करताना मध्य रेल्वेवरील लोकलचे मोटरमन, गार्ड यांच्याशी संवाद साधला. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील कामगार संघटनांसोबतही त्यांची बैठक झाली. रेल्वे नियंत्रण कक्ष, वातानुकूलित प्रसाधनगृह, हार्बरवरील एक आणि दोन नंबर फलाटासमोरील स्टार चेंबर्स, मोबाइल तिकीट स्कॅनिंग मशिनचीदेखील पाहणी करण्यात आली. या वेळी कामगार संघटनासोबतही बैठक झाली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघटनांसह आणखी काही कर्मचारी, कामगार संघटना बैठकीला उपस्थित होत्या. बैठकीत मोठय़ा प्रमाणात कमतरता असणाऱ्या मनुष्यबळावर चर्चा करण्यात आली. सिग्नल अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, गँगमन यासह अन्य काही विभागांत मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरच करावी. मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वे वसाहती असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या वसाहतींची डागडुजी करण्यात यावी, अशा मागण्या सादर करण्यात आल्या.

रेल्वेच्या भायखळा रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या आणि साधने यामुळे रुग्णालयात मृत्यूदर अधिक होत असल्याची माहिती लोहाणी यांना देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात सुधारणा करण्याची गरज असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात मध्य रेल्वे मजदूर संघाचे मुंबई विभागाचे सचिव अध्यक्ष एस. के. दुबे यांनी भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात गेल्या वर्षभरात मृत्यूदर वाढत असल्याचे सांगितले. त्याची माहिती रेल्वे बोर्ड अध्यक्षांना दिल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत प्रत्येक वर्षी मृत्यूदर २०० ते २५० दरम्यान झाला आहे. याआधी मृत्यूदर कमी होता. त्याचे प्रमाण वाढतच आहे. रुग्णालयात रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. मात्र उपचार व्यवस्थित होत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे ते म्हणाले.

मोटरमनला कठोर शिक्षा नको

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरमनशी संवाद साधताना लोहाणी यांच्यासमोर एक महत्त्वाचा विषयही मांडला. लोकल चालवताना सिग्नल असतानाही काही वेळा सिग्नल नियम मोटरमनकडून नकळतपणे मोडला जातो. काहीवेळा सिग्नल असतानाही लोकल त्यापुढे उभ्या केल्या जातात. अशा चुकांमध्ये मोटरमनला निलंबित केले जाते. वाढणाऱ्या लोकल फेऱ्या आणि कमी असलेले मनुष्यबळ यामुळे मोटरमनवर कामाचा ताण पडत आहे. अशातच त्यांच्याकडून चुका होत असल्या तरी त्यात कठोरता आणू नये आणि केल्या जाणाऱ्या निलंबनाच्या कारवाईत थोडा बदल करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे सांगितले.

 

First Published on January 14, 2018 2:03 am

Web Title: mortality rates more in byculla hospital