सुशांत मोरे

मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात सर्वाधिक वायफाय वापरकर्ते असल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण स्थानकात महिन्याला सरासरी तीन लाखांहून अधिक प्रवाशांकडून वायफायचा वापर केला जात असल्याची माहिती रेलटेलकडून उपलब्ध झाली. यानंतर पश्चिम रेल्वेवरील विरार, अंधेरी, बोरिवली आणि मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, ठाणे स्थानकेही अग्रेसर असून हार्बर प्रवासी मात्र या सेवेचा लाभ कमी प्रमाणात घेत असल्याचे माहितीतून समोर आले.

चित्रपट पाहणे, गाणी डाऊनलोड करणे, विविध विषयांची माहिती मिळवणे, एखाद्या ठिकाणाकडे जाणारा रस्ता शोधणे इत्यादीसाठी सर्वच जण इंटरनेटवर अवलंबून असतात. रेल्वे प्रवाशांना मोफत वायफाय उपलब्ध झाल्यास त्यांचे पैसे वाचतील आणि इंटरनेटवरील माहितीही विनाअडथळा व वेगाने मिळेल, या उद्देशाने २०१५ मध्ये देशभरातील ४०० स्थानकांत प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा देण्याचा निर्णय रेल्वेमंत्रालयाने घेतला. त्यानुसार रेलटेल व गुगल कंपनीमार्फत ही सेवा देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत देशभरातील ५ हजार ६१५ स्थानकांत वायफाय सेवा असून यातील ७० टक्के ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकांतही सुविधा उपलब्ध केल्याचे रेलटेल कंपनीकडून सांगण्यात आले. सध्याच्या घडीला देशभरात रेल्वे स्थानकात असलेल्या वायफायचे वापरकर्ते हे २ कोटी ९० लाख असून त्यांच्याकडून ८ हजार २८१ टेरा बाईट डाटा वापरला गेला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात वायफायचे वापरकर्ते सर्वाधिक आहे. जानेवारी २०२० पर्यंतची माहिती मिळाली असता यामध्ये कल्याण स्थानक अग्रेसर असून महिन्याला ३ लाख ९३ हजार २५१ प्रवाशांकडून ७६.६२ टेरा बाईट्स एवढा डाटा वापरण्यात आला आहे.

२२ स्थानकांवर महिनाअखेपर्यंत सेवा

सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १०४ स्थानकांपैकी २२ स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचे बाकी आहे. हे कामही मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर संपूर्ण पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागाबरोबरच अखत्यारीत येणारे अन्य विभागातील एकूण ४४० स्थानकांत वायफाय सुविधा आहे. यातील मुंबईतील ३७ उपनगरीय स्थानकांतील बहुतांश स्थानकात वायफायची सुविधा आहे.

गुगलची माघार :   रेल्वे स्थानकातील वायफाय सेवेतून गुगलनने माघार घेतली. वायफाय सेवेत गुगलचे  हार्डवेअर  होते. तर रेलटेलकडून वायफाय दिले जाते. गुगलने माघार घेतली तरीही यापुढे हार्डवेअरची जबाबदारी रेलटेलचीच राहणार आहे. त्याच्यासोबत अन्य कोणत्या कंपनीला रुची आहे का याचीही पडताळणी केली जात आहे. वायफाय सेवा सुरूच असल्याचे रेलटेलकडून स्पष्ट करण्यात आले.