छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात बफरला किरकोळ धडक दिलेल्या मोटरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पंकज गुलाबचंद इंदोरा असे या मोटरमनचे नाव होते. ते मूळचे जयपूरचे होते तर मुंबईतल्या जीटीबी नगर भागात असलेल्या रेल्वे वसाहतीत ते रहात होते.

२६ एप्रिल २०१९ रोजी हार्बर मार्गावरील बेलापूर स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आलेली लोकल फलाट क्रमांक १ ला धडकली होती. लोकलचा वेग कमी होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेनंतर पंकज गुलाबचंद इंदोरा यांची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. या घटनेला आठवडा उलटण्याआधी मोटरमन इंदोरा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

काय घडले होते २६ एप्रिलला?
बेलापूरहून निघालेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ११.३० वाजता फलाट क्रमांक एकवर येत असतानाच ती बफरला धडकली. या धडकेमुळे मोटरमनच्या मागे असणाऱ्या महिला डब्यातील प्रवाशांना जोरदार धक्का बसला. काही प्रवासी डब्यातच पडले. लोकल थांबताच अनेक प्रवासी तातडीने लोकलमधून उतरले व घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धडकलेली लोकल हळूहळू मागे घेतली. या लोकलची पाहणी केल्यानंतर ती कारशेडमध्ये रवाना केली. मात्र हार्बरची सेवा यामुळे विस्कळीत झाली होती.